Personal loan charges: गृहकर्ज किंवा वाहनकर्ज घेत असाल तर कर्जाची रक्कम तुम्हाला त्याच गोष्टीसाठी खर्च करावी लागते. मात्र, पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) तुम्ही कशासाठीही वापरू शकता. त्यावर कोणतेही बंधन नाही. वैयक्तिक कर्ज घेण्याची प्रक्रिया इतर कर्ज प्रकारापेक्षा जलद आहे. तत्काळ पैसे तुमच्या खात्यात जमा होतात.
पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. म्हणजेच कर्ज घेताना तुमच्याकडून कोणतेही तारण घेतले जात नाही. तसेच कमीतकमी कागदपत्रांद्वारे तुम्हाला कर्ज दिले जाते. अनेक फिनटेक कंपन्या काही मिनिटातही पर्सनल लोन मंजूर करण्याचा दावा करतात. मात्र, वैयक्तिक कर्ज घेताना कोणकोणते शुल्क लागू होतात याची माहिती कर्ज घेण्याच्या आधीच हवी. काही छुपे शुल्क आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे.
नुकतेच केंद्र सरकारने वैयक्तिक कर्ज देणाऱ्या काही फिनटेक कंपन्यांवर कारवाई केली होती. नियमांचे उल्लंघन अतिरिक्त शुल्क आकारणीचे आरोप ग्राहकांनी केले होते. त्यामुळे या कंपन्यांची चौकशी झाली होती. जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर कोणते शुल्क लागू होतील, हे आपण पाहू. वैयक्तिक कर्ज घेताना व्याजाचा दर, शुल्क वित्तसंस्थेनुसार आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसार बदलू शकतात.
पर्सनल लोनवर आकारले जाणारे शुल्क
लोन प्रोसेसिंग फी (Loan processing charges)
प्रत्येक वित्त संस्था वैयक्तिक कर्ज देताना किमान आणि कमाल लोन प्रोसेसिंग फी आकारते. कर्ज घेताना ग्राहकाला हे शुल्क भरावे लागतात. ही प्रोसेसिंग फी एकूण कर्ज रकमेच्या 0.5% ते 2.50 टक्के असू शकते. कोटक महिंद्रा बँक एकूण कर्ज रकमेच्या 3% पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारते. शुल्कावरील करही द्यावा लागू शकतो. कर्ज देताना ही शुल्काची रक्कम बँक कापून घेते.
व्हेरिफिकेशन शुल्क (पडताळणी शुल्क)
कर्ज देण्यापूर्वी कोणतीही वित्तसंस्था ग्राहकांची कर्ज फेडण्याची क्षमता आहे की नाही हे पडताळून पाहत असते. हे काम बँक सहसा त्रयस्थ संस्थेकडे (Third-party) सोपवते. तुमच्या कागदपत्रांची सत्यता या संस्थेकडून तपासली जाते. तसेच तुम्ही याआधी केलेले आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट अहवाल तपासले जातात. यासाठी होणारा खर्च बँक ग्राहकाकडून घेते.
इएमआय (EMI default Fine) भरण्यास उशीर झाल्यास दंड
कर्ज मिळाल्यानंतर ग्राहकाला मासिक हप्त्यांद्वारे कर्जाची परतफेड करावी लागते. मात्र, अनेक कारणांनी कर्जदाराला वेळेत हप्ता भरता येत नाही. EMI भरण्यास विलंब झाल्यास बँक ग्राहकाकडून दंड वसूल करते. त्यामुळे कर्जाचे हप्ते सुलभ आणि तुमच्या पैसे भरू शकण्याच्या क्षमतेनुसार निवडा. इएमआय भरण्यास उशीर झाल्यास कोटक महिंद्रा बँक प्रत्येक वेळी 500 रुपये दंड त्यावरील कर आकारते. IDFC First Bank इएमआय भरण्यास विलंब झाल्यास प्रत्येक वेळी 400 रुपये दंड आकारते. प्रत्येक बँकेचे हे शुल्क वेगवेगळे असू शकते. कर्जासाठी अर्ज करताना या शुल्काची माहिती तुम्ही बँकेकडून मिळवायला हवी.
वस्तू आणि सेवा कर (GST Tax)
कर्ज घेत असताना किंवा हप्ते भरत असताना जर कर्जदाराला बँकेकडून काही अतिरिक्त सुविधा हव्या असतील तर त्यावर वस्तू आणि सेवा कर भरावा लागेल. हा एक प्रकारचे सेवा शुल्क आणि त्यावरील जीएसटी असेल. ते बँक ग्राहकाकडून घेते. प्रत्येक वित्त संस्थेनुसार हे शुल्क वेगवेगळे असू शकते.
वेळेआधीच कर्ज प्रकरण बंद करत असाल तर शुल्क
समजा, तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैयक्तिक कर्ज घेतले आहे. मात्र, एक वर्षानंतरच कर्जाची रक्कम भरून कर्ज प्रकरण बंद करत असाल तर त्यासाठी बँक शुल्क आकारते. कारण, तुम्ही कर्जावर जे व्याज भरत असता त्यातून बँकेला फायदा होत असतो. जर तुम्ही आधीच पैसे भरून लोन बंद करत असाल तर बँकेचा तोटा होता. त्यामुळे हा चार्ज बँकेकडून आकारला जातो. याला फोरक्लोजर चार्ज असेही म्हणतात. एकूण कर्ज रकमेच्या 2 ते 4% हे शुल्क असू शकते.
कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच रद्द करत असाल तर लोन अमाउंटच्या 1% आणि त्यावरील व्याज शुल्कापोटी दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच इतरही अनेक प्रकारचे शुल्क वैयक्तिक कर्ज घेताना लागू होतात. व्यवस्थित माहिती घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. कागदपत्रे, फिजिकल बँक स्टेटमेंट, एनओसी, पार्टपेमेंट इ साठीही शुल्क आकारले जाते. याची माहिती बँक प्रतिनिधीला विचारायला विसरू नका.