Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच येणार नुकसानीचा अंदाज, काय आहे पेप्सिकोचं क्रॉप इंटेलिजन्स मॉडेल?

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच येणार नुकसानीचा अंदाज, काय आहे पेप्सिकोचं क्रॉप इंटेलिजन्स मॉडेल?

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेप्सिकोनं एक नवं मॉडेल आणलंय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बटाट्याचं उत्पादन (Potato) वाढवण्यास मदत होणार असल्याचा दावा पेप्सिकोनं केलाय. अनेकवेळा हवामानाचा अंदाज न आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. उत्पादनात मोठी घट होते. हे टाळण्यासाठी या मॉडेलचा उपयोग केला जाणार आहे.

80 टक्क्यांपर्यंत नुकसान

क्रॉपिन या अग्रगण्य जागतिक कृषी-तंत्रज्ञान कंपनीच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. हा उपक्रम भारतासाठी पेप्सिकोच्या 'प्रिसिजन अॅग्रीकल्चर' (Precision Agriculture) मॉडेलचा एक भाग आहे. देशातल्या गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतल्या डेमो फार्ममध्ये हा प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे. देशात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. अनेकांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी शेतजमीन आहे. त्यातही अनेक समस्या आहेत. पाणी, खते आणि कीटकनाशके यांसारख्या कृषी निविष्ठा तसंच हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारी कोणतीही प्रणाली विकसित नाही. त्यामुळे नैसर्गिक संकटांमध्ये मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं. बटाट्याच्या बाबतही हीच परिस्थिती आहे. हवामानाचा योग्य अंदाज न लावल्यास बटाटा पिकाचं रोगामुळे होणारं नुकसान जवळपास 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं. भूगर्भातल्या दवामुळे होणारं लक्षणीय नुकसान ही बटाटा शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये प्रामुख्यानं ही समस्या जाणवते.

लेजसाठी शेतकऱ्यांना सहाय्य

शेतकऱ्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी पेप्सिकोच्या (PepsiCo) मालकीच्या ब्रँड लेज (Lay's) अंतर्गत आता नवीन उपक्रम राबवला जातोय. रिमोट सेन्सिंग डेटाशी संबंधित सॅटेलाइट इमेज (उपग्रह प्रतिमा) वापरून या आव्हानांना तोंड देता येणार आहे. या प्रणालीद्वारे 10 दिवस अगोदरच अंदाज तयार करता येवू शकतो. शेतकऱ्यांना पिकांचे विविध टप्पे ओळखता येवू शकतात. निरीक्षणात काही आढळलं तर लगेच पावलं शेतकऱ्यांना उचलता येतात. हवामान अंदाज, रोगासंबंधीचा अंदाज या बाबींचा यात समावेश आहे.

उपायांवर भर

मॉडेल नेमकं काय आहे, कसं काम करतं याची माहिती पेप्सिको इंडियाचे अॅग्रो डायरेक्टर अनुकुल जोशी यांनी दिली. आमची कंपनी एक कृषी कंपनीच आहे. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करणारे आणि सर्वसमावेशक असे शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक उपाय आणणं आमचं ध्येय आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारणं हेदेखील यात येतं. त्याच आधारावर हा नवा उपक्रम आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या पीकाद्वारे चांगलं उत्पन्न प्राप्त करून देणं, उत्पादनाची गुणवत्ता, पीकाचं आरोग्य आणि गुणवत्ता राखणं त्याचबरोबर पीकाचा कालावधी आणि त्याला अनुसरून योग्य ते उपाय यावर आम्ही भर देत आहोत, असं ते म्हणाले.

व्यवसायातल्या जोखीम करण्याचा पेप्सिकोचा प्रयत्न

शेतकऱ्यांसोबतच्या या भागीदारीसंबंधी क्रॉपिनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार यांनीही माहिती दिली. पेप्सिको ही आपल्या लेजच्या ब्रँडद्वारे कृषी आधुनिकीकरण आणि त्याचा तळागाळात होणारा परिणाम सक्षम करण्यासाठी हा पुढाकार घेत आहे. डिजिटल पर्यायांचा वापर करून व्यवसायाच्या वाढीस मदत करण्याचा प्रयत्न आहे. देशात अल्पभूधारक शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे. त्यांचं सक्षमीकरण करणं, त्याला गती देणं, शाश्वतता वाढवणं आणि जागतिक शेतीमध्ये नवीन मानकं प्रस्थापित करणं, हे आमचं ध्येय आहे. क्रॉपिनच्या प्लॉट-स्तरावरच्या इंटेलिजन्स मॉडेलचा वापर करून पेप्सिको व्यवसायातल्या जोखीम कमी करत आहे. पीक उत्पादन आणि आरोग्य, पाण्याचा अंदाज लावत आहे. कार्यक्षम व्यवसाय व्यवस्थापनासाठी कीटक आणि रोग नियंत्रणासंबंधी अंदाजासाठी सिग्नल यंत्रणा असणार आहे.

गुजरात, मध्य प्रदेशात काम

पेप्सिको ही भारतात 14 राज्यांमधल्या 27,000हून अधिक शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम करत आहे. लेज या ब्रँडसाठी 100 टक्के बटाटे देशातल्या शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्याच्या प्रायोगिक टप्प्यात, शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण फील्ड अॅग्रोनोमिस्ट्सद्वारे प्रदान केली जात आहे. या माध्यमातून त्यांना डॅशबोर्ड समजून घेण्यास मदत करत आहेत.प्रायोगिक तत्वावर सध्या गुजरातमधल्या 51 आणि मध्य प्रदेशातल्या 11 अशा 62 शेतांचा समावेश आहे.

विविध भाषांना सपोर्ट

आपल्या स्मार्टफोनमध्ये वापरण्यास सोपे असे अॅप डाउनलोड करून डॅशबोर्ड आणि संबंधित माहिती शेतकरी मिळवतील. क्रॉपिन ग्रो फॉर फार्म डेटा मॅनेजमेंट आणि पीक इंटेलिजेंससाठी प्लॉट रिस्क, अशा बाबींचा यात समावेश आहे. हे अॅप्स विविध भाषांना सपोर्ट करू शकतात. पेप्सिकोनं पुरवठा साखळीतल्या 14 प्रादेशिक भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिलीय. पेप्सिकोनं भारतात 2018 साली कृषी ऑपरेशन्सच्या डिजिटलायझेशनसह कृषी तंत्रज्ञानाचा शोध सुरू केला. याला स्मार्ट अॅग्रो प्रोग्राम अंतर्गत सॅप (SAP) प्रणालींमध्ये अंतर्भूत करण्यात आलं. परवडणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे उत्पादकता आणि पाण्याची सुरक्षितता वाढवून मूल्य वाढवणं हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट होतं. क्रॉप इंटेलिजन्स मॉडेल ही आणखी एक डिजिटल नवीन कल्पना आहे. इतर उपायांच्या तुलनेत प्रति एकर कमी खर्चात ती वापरता येईल. यामुळे लहान शेतकरीदेखील त्याचा फायदा उठवू शकतील.