2002 साली किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या बँक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. काल इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याबाबत चर्चा पार पडली. या बैठकीत 1 नोव्हेंबर 2002 पूर्वी बँकांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 100% DA लाभ देण्यावर सहमती झाली आहे. म्हणजेच आता लवकरच निवृत्त कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याबाबतची पेंडिंग प्रकरणे निकाली लागणार आहेत आणि पेन्शनमध्ये देखील वाढ होणार आहे.
तारखेचा घोळ सुधारला!
याआधी इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) 28 जून 2023 रोजी एक अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेनुसार ‘नोव्हेंबर 2022’ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येईल असे म्हटले होते. या निर्णयाला निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यांनतर इंडियन बँक्स असोसिएशन(IBA) आणि विविध बँक कमर्चारी संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत अधिसूचनेवर उल्लेख केलेले वर्ष चुकीने लिहिले गेले आहे असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी स्पष्ट केले आणि 2002 सालानंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळेल असे सांगितले. याबाबतची माहिती लवकरच अर्थ मंत्रालयाला कळवली जाईल आणि त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे.
वेतन आयोगावर चर्चा नाही!
काही दिवसांपूर्वी बँक कर्मचाऱ्यांच्या पगार निश्चितीबाबत आयोग नेमण्याची घोषणा इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) केली होती. याबाबत देशभरातील विविध बँक कर्मचारी संघटनांशी चर्चा सुरु आहे. या बैठकीत महागाई भत्त्यातील वाढ आणि पेन्शन वाढ, विमा सुरक्षा, आरोग्य विमा या मुद्द्यांची देखील चर्चा होणे अपेक्षित होते मात्र त्यावर चर्चा झाली नाही. या वर्षाअखेरीस यावर निर्णय होऊ शकतो आणि पुढील वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांचे पगार वाढू शकतात.