डिजिटल पेमेंटची सेवा देणाऱ्या Paytm या कंपनीने या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची (Q1) आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे वार्षिक उत्पन्न 39 टक्क्यांनी वाढून 2342 कोटी झाले आहे. जून तिमाहीत कंपनीचा तोटाही कमी झाला असून त्यामध्ये वार्षिक 45 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीचा तोटा हा 645 कोटी रुपयांवरून 358 कोटींवर आला आहे.
Paytm Payment उत्पन्नात 31 टक्क्यांनी वाढ
पेटीएम पेमेंट ( Paytm Payment)चे उत्पन्न 31 टक्क्यांनी वाढले असून या तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात 1414 कोटींची भर पडली आहे. तसेच पेटीएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे उत्पन्न वार्षिक 93 टक्क्यांनी वाढून 522 कोटी रुपये झाले आहे. तसेच पेटीएमच्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर वितरीत करण्यात आलेल्या वर्षभरातील कर्जांची एकूण संख्या 51 टक्क्यांनी वाढली Paytm ने 1.28 कोटी कर्जे वितरित केली आहेत. तर कर्जाचे मूल्य वर्षभरात 167 टक्क्यांनी वाढून 14,845 कोटींवर पोहोचले आहे.
व्यापारी ग्राहकांच्या संख्येत वाढ
पहिल्या तिमाहीत, Paytm चे एकूण व्यापारी मूल्य वार्षिक आधारावर 37 टक्क्यांनी वाढून 4.05 लाख कोटी झाले आहे. डिजिटल पेमेंट मुख्य प्रवाहात आल्याने आणि साउंडबॉक्स आणि POS मशीन्स सारख्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा व्यापारी ग्राहक वर्ग हा 3.6 कोटींपर्यंत वाढला आहे. गेल्या एका वर्षात, जून 2023 पर्यंत व्यापारी ग्राहकांची संख्या दुपटीने वाढून 79 लाख झाली आहे.