वास्तविक CoviD-19 चा काळ एकूणच आर्थिक व्यवस्थापनाचे नव्याने धडे देणारा. इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये येणारा नवीन गुंतवणूकदार हा तरुण, tech-savvy आणि फायनान्शिअल मॅनेजमेंट अधिक सजगतेने अभ्यासणारा आणि केवळ आर्थिक सुरक्षितताच (financial security) नव्हे तर आर्थिक सुबत्ता (financial prosperity) देखील आवश्यक मानणारा पहायला मिळतोय.
Participating (अर्थात सहभागी स्वरूपाची) लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, ज्याला “PAR पॉलिसी” असेही संबोधले जाते, पॉलिसीधारकाला लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या नफ्यामध्ये (profit) भाग घेण्याची परवानगी देते. लाईफ इन्शुरन्स कंपनी देखील इतर, सर्व संस्थांप्रमाणे, आर्थिक वर्षात नफा कमावते. मात्र Participating (म्हणजे PAR) पॉलिसीजमध्ये कंपनीने मिळविलेल्या नफ्याचा फायदा पॉलिसीधारकाला सुद्धा दिला जातो. हा फायदा पॉलिसीधारकाला दरवर्षी बोनस किंवा लाभांश (Dividend) स्वरूपात दिला जातो. पॉलिसीधारक एकत्र हा बोनस किंवा लाभांश दरवर्षी घेऊ शकतो अथवा त्याचे दरवर्षीचे प्रीमियमची रक्कम भरण्यासाठी वापरू शकतो. एवढेच नव्हे तर तो बोनस किंवा लाभांश तसाच इन्शुरन्स कंपनीकडे जमा होऊन देऊ शकतो आणि जमणाऱ्या फंडावर देखील व्याज (interest) मिळवू शकतो. आणि हे सर्व फायदे पॉलिसीमध्ये निश्चित केलेल्या मॅच्युरिटी अमाऊंटच्या व्यतिरिक्त असणारे लाभ आहेत. एवढेच नव्हे तर, काही इन्सुरर्स “PAR पॉलिसी”वर एकत्रित बोनस (accumulated bonus) / लाभांश आणि मॅच्युरिटी झाल्यावर टर्मिनल बोनस (अंतिम बोनस) देतात. “PAR पॉलिसी”च्या अंतर्गत “गॅरंटीड फायदे” तर मिळतातच, परंतु काही “नॉन-गॅरंटीड फायदे” देखील मिळतात.
Non-Participating (अर्थात गैर-सहभागी स्वरूपाची) लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला “NON PAR पॉलिसी” असेही संबोधले जाते. Participating इन्शुरन्स पॉलिसीच्या उलट, Non-Participating इन्शुरन्स पॉलिसी इन्शुरन्स कंपनीच्या नफ्यावर आधारित कोणताही बोनस किंवा लाभांश (dividend) देत नाही. कारण “NON PAR पॉलिसी” बहुतांश करून पारंपरिक लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स असतात. त्यांच्याकडे इन्शुरन्स कंपनीच्या नफ्यात वाटा म्हणून लाभांश / बोनस मिळविण्यासाठी कोणत्याही तरतुदी नसतात. मात्र असे असले तरी देखील, या पॉलिसीज् पॉलिसीधारकाला प्रॉमिस केलेले मॅच्युरिटी बेनिफिट्स किंवा नॉमिनींना डेथ बेनिफिटस् निश्चितपणे देतातच. म्हणजेच “NON PAR पॉलिसी” च्या अंतर्गत केवळ आणि केवळ “गॅरंटीड फायदे” मिळतात.
“PAR पॉलिसी”मध्ये तुलनेने जोखीम (risk level) जास्त असते. तसेच बोनसची किंवा लाभांशाची रक्कम निश्चित कॅल्क्युलेट करून सांगता येत नाही कारण ती इन्शुरन्स कंपनीच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असते. याव्यतिरिक्त “PAR पॉलिसीज्” तुलनेने जास्त लवचिक (flexible) असतात. कारण पॉलिसीधारक त्याच्या गरजेनुसार त्याची गुंतवणूक केलेले फंड / मालमत्ता सहजपणे रीडायरेक्ट किंवा शिफ्ट करू शकतो. आणि हे मुख्यतः ULIP सारख्या मार्केट-लिंक्ड पॉलिसींच्या बाबतीत शक्य होत असते. याउलट “NON PAR पॉलिसी” तुलनेने कठोर (rigid) असतात. अर्थात त्यांच्यामध्ये जोखीम देखील कमी (जवळपास शून्य इतकी) असते. आणि म्हणूनच त्यांचा प्रीमियमचा दर देखील कमी असतो. त्यामुळे संपत्ती निर्मिती (wealth creation) पेक्षा आर्थिक सुरक्षितता प्राधान्य असणाऱ्या गुंतवणूकदारांनी “NON PAR पॉलिसी” मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
या सर्व पार्श्वभूमीवर, ULIP सारख्या “PAR पॉलिसी” मात्र काही गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण लाईफ कव्हरसोबतच आकर्षक परतावा (handsome returns) आणि मिळणाऱ्या परताव्यावर कर-लाभ (Tax benefits) असा तिहेरी लाभ मिळतो. अर्थातच, हे रिटर्न्स कंपनीच्या मार्केट परफॉर्मन्सवर अवलंबून असतात.