सध्या आर्थिक फसवणुकीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढतायेत. सायबर चोर नवनवे फंडे शोधून सामान्य नागरिकांचे बँक खाते रिकामे करत आहेत. अशातच एक नवा फसवणुकीचा प्रकार सायबर चोरांनी वापरायला सुरुवात केली आहे. हा प्रकार आहे ‘पार्सल स्कॅम’चा.
या प्रकारात कुणाही व्यक्तीला कुरियर देण्यासाठी एक व्यक्ती येतो. खरे तर ता व्यक्तीने कुठलीही ऑर्डर केलेली नसते. ज्याच्याकडे कुरियर येते ती व्यक्ती देखील गोंधळते. अशावेळी कुरियर घेऊन आलेली व्यक्ती सदर व्यक्तीला ऑर्डर रद्द करण्यासाठी एक प्रोसेस करायला सांगते. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो सांगा आणि त्यांनतर तुमची ही ऑर्डर आम्ही परत घेऊन जाऊ असे सांगितले जाते. संबंधित व्यक्ती त्या कुरिअर बॉयला ओटीपी देते आणि तो निघून गेल्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज येतो.
खरे तर ही एक नवी शक्कल सायबर चोरांनी शोधून काढली आहे. जर तुम्ही पार्सल स्वीकारले नाही तरी तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्यातून पैसे आकारले जातील असेही हे कुरिअर बॉय नागरिकांना सांगतात त्यामुळे भितीपोटी लोक ओटीपी शेयर करतात आणि स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतात.
अशावेळी काय कराल?
असा प्रकार जर तुमच्यासोबत घडत असेल तर वेळीच सावध व्हा. जर तुम्ही कुठलीही वस्तू ऑर्डर केली नसेल तर त्याबाबत चिंता करायचे कारण नाही. असे पार्सल न घेतलेलेच बरे. तसेच पार्सल घेताना कुणालाही ओटीपी, बँकेचे तपशील, क्रेडिट कार्ड किना डेबिट कार्डचे डीटेल्स शेअर करू नका.
आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) याबाबत एक निवेदन जाहीर केले असून, ‘पार्सल स्कॅम’ पासून सावध राहण्याचा सल्ला त्यांनी ग्राहकांना दिला आहे. कुणाही अनोळखी व्यक्तीसोबत बँकेचे व्यवहार करू नये, ओटीपी शेअर करू नये असे बँकेने म्हटले आहे.
तसेच अशा फसवणुकीची तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे विभागाला cybercrime.gov.in वर कळवा किंवा हेल्पलाइन 1930 वर कॉल करा.