India Rice Ban: युरोप, अमेरिका तसेच पश्चिम आशियाई देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांची (NRI) तांदूळ खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. लोकल ग्रोसरी स्टोअरमधून भारतीय नागरिक तांदळाच्या गोण्या खरेदी करत आहेत. यामागे कारण म्हणजे, भारताने बासमती सोडून इतर प्रजातीच्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय तांदूळ बाजारात मिळणार नाही, अशी भीती परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना वाटत आहे.
दक्षिण भारतीयांकडून सर्वाधिक तांदूळ खरेदी
उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांमध्ये राहणाऱ्या तेलुगू भाषिक नागरिकांची तांदूळ खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. दक्षिण भारतातील नागरिकांचा मुख्य आहार तांदूळ आहे. तसेच बासमती सोडून इतर प्रजातीचा तांदूळ हा त्यांच्या आहाराचा मुख्य भाग आहे. बासमतीपेक्षा हा तांदूळ स्वस्तही मिळतो. मात्र, आता हा तांदूळ निर्यात बंदी झाल्याने स्वस्तात तांदूळ मिळणार नाही, ही भीती नागरिकांमध्ये पसरली.
अनेक देशांतील ग्रोसरी मॉलमध्ये भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर तांदूळ खरेदी करताना दिसून आले. यासंबंधीचे व्हिडिओही काही नागरिकांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. तांदळाचा साठा करून ठेवण्याकडे भारतीयांनी भर दिला. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
ग्रोसरी मॉलबाहेर तांदूळ खरेदीसाठी लांब रांगा
तांदळाचा तुटवडा निर्माण होईल म्हणून दक्षिण भारतातील नागरिकांनी ग्रोसरी शॉपच्या बाहेर खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत. बिलिंग काउंटरवरही गर्दी दिसून येत आहे. 9 किलो तांदळाची बॅग 27 डॉलरला मिळत असल्याचे TOI ने म्हटले आहे.
अमेरिकेतील टेक्सास, मिशिगन, न्यू जर्सी या इंडियन ग्रोसरी स्टोअर असलेल्या शहरातील नागरिकांनी खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी केली. काही स्टोअर्सने तांदूळ खरेदीवर निर्बंध घातले आहेत. एकावेळा फक्त एकच तांदळाची बॅग खरेदी करता येईल, असा नियम तयार केला आहे. सोनामसुरी, एचएमटी, कोलम इ. या सर्वसामान्य प्रजातीच्या तांदळाचे एनआरआय रोज सेवन करतात. मात्र, हा तांदूळ मिळणार नाही, किंवा दर चढे राहतील, ही भीती भारतीय ग्राहकांमध्ये पसरली आहे.
20 जुलैला भारताचे निर्यातीवर निर्बंध
कोरोनानंतर जगभरात तांदळाच्या किंमती वाढलेल्या आहेत. आशियाई देशात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सातत्याने उत्पादनात घट होत असल्याने अनेक देशांनी निर्यात कमी केली आहे. भारतानेही बासमती सोडून इतर प्रजातींची निर्यात 20 जुलैला थांबवली. त्यामुळे येत्या काळात आणखी तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला?
दक्षिण आफ्रिकेतील बेनिन हा देश बासमती सोडून इतर प्रजातीला सर्वाधिक भारतीय तांदूळ आयात करतो. त्यासोबत नेपाळ, बांगलादेश, चीन, Cote D' Ivoire, टोगो, सेनेगल, गिनिया, व्हिएतनाम, दिजिबुती, मादागास्कर, कॅमरुन सोमालिया, मलेशिया, लायबेरिया आणि युएई देशात सर्वाधिक भारतीय तांदूळ जातो. भारताने सप्टेंबर 2022 मध्ये तुकडा तांदूळ निर्यातीवर बंदी घातली. तसेच बासमती सोडून इतर प्रजातींवर 20 टक्के शुल्क लागू केले होते. मात्र, आता तांदळाची निर्यातच बंद केली आहे.