Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठल-रखुमाईच्या दगडी मूर्तींनी सजली पंढरपूर नगरी; दरवर्षो होते कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Ashadhi Ekadashi 2023

Ashadhi Ekadashi 2023: देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेत आहे. या शिल्पकलेच्या माध्यमातून पंढरपुरातील वडार समाज आजही दगड्याच्या माध्यमातून विठ्ठलाला घरोघरी पोहचवत आहेत. दगडी मूर्तीच्या विक्रीतून दर आषाढी एकादशीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.

Stone Idols Of Vitthal Rukhumai: ओभड धोभड दगडातून आकर्षेक भावमुद्रा तयार करण्याची कला म्हणजे शिल्पकला. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक एकत्र येतात. विठ्ठल-रुखुमाईच्या चरणावर आपले डोके ठेवल्यानंतरच या भाविकांना हायसे वाटते. पंढरपुरातील विठ्ठल-रुखुमाईच्या मंदिरात असलेल्या मूर्तीला बघितल्यास साक्षात विठ्ठलच आपल्याकडे बघत असल्याचा भास भाविकांना होतो. तेव्हा अनेक भाविक येथून घरी जाताना मूर्ती स्वरुपात अनेक आठवणी आणि आशीर्वाद सोबत घेऊन जातात.

देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेत आहे. अनेक पिढ्यांपासून या व्यवसायाचे तत्व जपणारा वडार समाज आजही हे काम नित्यनेमाने करत आहे. वडर समाजा व्यतिरिक्त अनेक व्यावसायिक देखील अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय करतात. आषाढी यात्रेसाठी ग्राहकांनी केलेल्या मागण्यांनुसार विठ्ठलाच्या आणि इतर देवी-देवतांच्या शेकडो मूर्ती येथे बनवल्या जातात.

10 हजारापासून 5 लाखापर्यंतच्या मूर्ती

विठ्ठल-रुखुमाई बरोबरच इतरही देवांच्या आणि अनेक संतांच्या दगडी मूर्ती  येथे ऑर्डरप्रमाणे तयार केल्या जातात. 10 हजार रुपयांपासून 5 लाखांपर्यंत विविध आकाराच्या दगडी मूर्ती पंढरपुरात तयार केल्या जातात. मूर्ती तयार करण्याचे अनेक कारखाने येथे आहेत. या मुर्तींना देशासह परदेशात देखील मागणी आहे. आषाढी एकादशीच्या दोन महिन्या अगोदरपासून मूर्ती तयार करण्याचे काम सुरु केले जाते. इथल्या एका कारखान्यात किमान 25 ते 30 कामगार मूर्ती बनवण्याचे काम करतात.

आकारानुसार मूर्तीची किंमत

शिल्पकलेच्या लहान आकाराच्या मूर्तींना सगळ्यात जास्त मागणी आहे. त्यात दागिण्यांनी नटलेल्या विठ्ठल-रुखुमाईच्या दगडी मूर्तीला सगळ्यात जास्त मागणी असते. यामध्ये 1 फुटाच्या मूर्तीची किंमत साधारणपणे 12,000 ते 15,000 रुपये आहे. तर 3 फुटाच्या मूर्तीची किंमत साधारणपणे 51,000 ते 55,000 रुपये आहे. शालीग्राम दगडापासून तयार केलेल्या मूर्तींना सगळ्यात जास्त मागणी आहे.

शेकडो कारागिरांना मिळतो रोजगार

शालीग्राम दगड हा कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथून आणला जातो. त्यातही स्वयंभू मूर्तीला सगळ्यात जास्त मागणी असते. सर्वच मूर्ती या ऑर्डरप्रमाणे तयार केल्या जातात. विठ्ठल मंदिरातील मूर्ती ही वालूकाश्म दगडापासून तयार करण्यात आलेली आहे. परंतु आता तो दगड सहजासहजी मिळत नसल्याची माहिती कारागिरांनी दिली. आषाढी वारी निमित्त अनेक मूर्ती तयार केल्या जातात आणि विकल्या जातात. ज्या तीन फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असतात. त्या भाविक मंदिरात स्थापना करण्यासाठी नेतात. अशाप्रकारे आषाढी वारीमध्ये एका कारखान्यामधून 100 ते 200 मूर्ती प्रमाणे विकल्या जातात. त्यामुळे दर वारीला या दगडी मूर्तींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल येथे होते. तसेच शेकडो कारागिरांना रोजगार देखील मिळतो.