पंढरपुरात भाविकांची आषाढी एकादशीनिमित्त (Aashadhi ekadashi) दुसरीकडे वारकरीदेखील आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतील. नियमित भाविकांसह वारकऱ्यांसाठी पंढरपुरात देवस्थानतर्फे सुविधा उपलब्ध करण्यात येत असतात. निवासासह राहण्याची सोय यात मिळते. प्रसाद म्हणून लाडूदेखील (Ladoo) येतो. यंदाही मोठ्या प्रमाणात लाडूंची विक्री करण्यात येत आहे. यंदा जवळपास 15 लाख लाडू बनवण्यास सुरुवात झाली आहे. यातून देवस्थानला चांगलं उत्पन्नही (Revenue) मिळणार आहे.
Table of contents [Show]
दररोज 15000हून जास्त लाडू
देवस्थानकडून तयार होणाऱ्या बुंदीच्या लाडूला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो. मोठी मागणी असल्यामुळे देवस्थानदेखील दरवर्षी भाविकांना तो उपलब्ध करून देत असते. यंदा 15 लाख लाडू बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर आणखी 5 लाख लाडूदेखील मागणी वाढल्यास बनवले जातील, असं देवस्थानतर्फे सांगण्यात आलं आहे. दररोज साधारणपणे 15000 आणि त्याहूनही जास्त लाडू बनवले जातात.
कोणतं साहित्य आणि खर्च किती?
साधारणपणे 5200 लाडू बनवण्यासाठी 1 क्विंटल हरभऱ्याची डाळ, 150 किलो साखर, 75 किलो शेंगदाण्याचं तेल, 2 किलो काजू, 2 किलो बेदाणे तसंच गरजेनुसार वेलची आणि इतर छोटं मोठं साहित्य यात वापरलं जातं. एक क्विंटल म्हणजेच 5200 लाडू तयार करण्यासाठी साधारणपणे 37000 रुपये खर्च येतो. त्यातून 52000 रुपयांचं उत्पन्न मंदिर समितीला मिळतं. म्हणजेच महिन्याला 10 लाख रुपयांचा नफा यातून मंदिर समितीला मिळतो.
भाविकांसाठी लाडूची किंमत
पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी 2 लाडूचं एक पाकिट असणार आहे. याची किंमत 20 रुपये ठेवण्यात आली आहे. आधी लाडूची निर्मिती ठेकेदाराकडून केली जात होती. हेच लाडू भाविकांना दिले जात होते. मात्र काही दिवसांपूर्वी मंदिर समितीनं लाडू तयार करण्याचा हा ठेका रद्द करून हे काम स्वत:कडे घेतलं. आता चांगल्या दर्जाचा लाडू भाविकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंदिर समितीला नेमकं उत्पन्न किती?
एका क्विंटलमागे जेवढे लाडू तयार होतात, त्याच्या उत्पन्नाचं गणित तर पाहिलं. त्यानुसार मागच्या काही दिवसांतलं देवस्थान समितीचं उत्पन्नही पाहूया. सध्या लाडूची 20 रुपये इतकी अल्पदरात विक्री केली जात आहे. मात्र मंदिर समितीनं ठेका रद्द करून स्वत: लाडू तयार करायला सुरुवात केल्यापासून उत्पन्नातही वाढ झाली आहे. 14 एप्रिल ते 20 मे या कालावधीत मंदिर समितीकडून 2 लाखांहून जास्त लाडू तयार करण्यात आले. या माध्यमातून 25 लाखांहूनही जास्त उत्पन्न मंदिर समितीला मिळालं आहे. सर्व खर्च वजा करता महिन्याभरात मंदिर समितीला 10 लाखांहून अधिकचा नफा मिळाला आहे. येत्या काळात त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
मंदिर समितीच्या विविध योजना
अन्नछत्र कायमठेव योजना
श्री संत जगद्गुरू तुकाराम भवन इथल्या तळमजल्यावर अन्नछत्र चालवलं जातं. यात भाविकांनी गुंतविलेल्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी भाविकांनी ठरवलेल्या तारखेला अन्नदान करण्यात येतं. यासाठी किमान ठेव रक्कम रूपये 5 हजार रुपये आहे. सध्या अन्नछत्रामध्ये दररोज 700 ते 800 भाविक प्रसादाचा लाभ घेतात. तर या अन्नछत्राची वेळ दुपारी 12 ते 2 अशी ठेवण्यात आलेली आहे.
महानैवेद्य कायम ठेव
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीतर्फे दररोज महानैवेद्य दिला जातो. यात भाविकांनी किमान रक्कम रूपये 15 हजार गुंतवावी लागते. याच्या व्याजातून दरवर्षी त्या भाविकांच्या नावे त्यांनी ठरवलेल्या आणि समितीकडे उपलब्ध असलेल्या तारखेला विठ्ठल रूक्मिणीला महानैवेद्य समर्पित केला जातो.
गोशाळा पशुखाद्य कायम ठेव योजना
मंदिर समिती संचलित यमाई तलावाच्या जागेत गोशाळा आहे. सध्या याठिकाणी गायी, वासरं मिळून 70 ते 80 पशुधन आहे. इथून निघालेल्या दुधाचा श्रींच्या दैनंदिन उपचारासाठी वापर केला जातो. गोशाळेतल्या गायीच्या खाद्यासाठी कायमठेव योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत किमान 15 हजार रुपये रक्कम गुंतवल्यास त्या रकमेच्या व्याजातून भाविकांनी सांगितलेल्या दिवशी त्यांच्या नावे गायींना खाद्य पुरवण्यात येतं.