Panasonic Battery: जपानमधील बलाढ्य कंपनी पॅनासॉनिक भारतामध्ये बॅटरी निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतामध्ये इव्ही इंडस्ट्री वाढत असल्याने कंपन्यांना बॅटरी निर्मितीतील संधी खुणावत आहेत. तसेच केंद्र सरकारद्वारे बॅटरी निर्मितीसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंनसेन्टीवही (PLI) कंपन्यांना दिले जातात. त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात पॅनासॉनिक कंपनी आहे.
सरकारी अधिकाऱ्यांसोबत व्यवस्थापनाच्या बैठका
चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी आणि पॅनासॉनिक कंपन्यांच्या व्यवस्थापनामध्ये बैठक झाली. निती आयोगाचे प्रमुख आणि जी-20 संघटनेचे शेर्पा अमिताभ कांत आणि अवजड उद्योग विभागाचे सचिव कामरान रिझवी यांनी पॅनॉसॉनिक कंपनीचे सीईओ कझुओ तडानोबू आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. कंपनीच्या भारतातील उद्योगाचे प्रमुख मनिष शर्मा हे देखील बैठकीला उपस्थित होते.
PLI योजनेचा मिळणार फायदा
बॅटर निर्मिती प्रकल्प भारतामध्ये सुरू करण्यास पॅनॉसॉनिक उत्सुक असल्याचे त्यांनी सरकारला सांगितले. दरम्यान, पॅनासॉनिक कंपनीने याबाबत अधिकृत वक्तव्य दिले नाही. केंद्र सरकारची प्रॉडक्शन लिंक्ड इंनसेंटिव्ह ही 18,100 कोटींची योजना आहे. ह्युंदाई ग्लोबल मोटर्स या कंपनीने PLI योजनेंतर्गंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर माघार घेतली. त्याऐवजी आता पॅनासॉनिक या योजनेचा फायदा घेण्याची शक्यता आहे.
ऑटो कंपन्यांना बॅटरी पुरवठा करणार
टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मर्सडिझ बेन्झ, ह्युंदाई आणि फोक्सवॅगन या कंपन्यांना पॅनासॉनिकद्वारे बॅटरीचा पुरवठा केला जाऊ शकतो. देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्या पाश्वभूमीवर बॅटरी उद्योगही मोठा होत आहे.
एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीसाठी पॅनॉसॉनिक सर्वाधिक बॅटरी पुरवठा करते. ऑटोमोबाइल बॅटरी क्षेत्रात भारतामध्ये भविष्यात संधी असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी पॅनासॉनिक कंपनीच्या व्यवस्थापनास सांगितले. बॅटरी निर्मितीसाठी केंद्र सरकारने ACC battery program ही योजना राबवली आहे. यासाठी बोली लावलेल्या कंपन्यांपैकी फक्त 4 कंपन्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यातून ह्युंदाई बाहेर पडल्याने त्याजागी पॅनासॉनिकची निवड होऊ शकते.