सध्या पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. सामान्य नागरिकांना पाकिस्तानात दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करताना देखील प्रचंड महागाईला समोरे जावे लागत आहे.मीठ, पीठ, मसाले, फळभाज्या आदी वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून तेथील केंद्र सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करताना दिसत आहे.
अशातच गंभीर आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानला आंतराष्ट्रीय नाणेनिधीचा (International Monitory Fund) आधार मिळाला आहे. पाकिस्तानला पुढील नऊ महिन्यांत तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले जाणार आहे. याआधी देखील नाणेनिधीकडून पाकिस्तानने वेळोवेळी कर्ज घेतलेले आहे. हे नवीन कर्ज घेतल्यानंतर पाकिस्तान आयएमएफचा चौथा सर्वात मोठा कर्जदार देश बनणार आहे.
कोरोनोत्तर काळात आशिया खंडातील विकसनशील देशांना महागाईचा, बेरोजगारीचा मोठा सामना करावा लागला आहे. श्रीलंका, पाकिस्तान या देशांनी तर आर्थिक अराजकता देखील अनुभवली आहे. सध्या पाकिस्तान IMF चा पाचवा सर्वात मोठा कर्जदार आहे, परंतु तीन अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान चौथा सर्वात मोठा कर्जदार देश बनेल.
इतर कर्जदार देश कोणते?
जागतिक आर्थिक मंदीचा सामना करत असलेले युरोपियन देश देखील कर्जबाजरी आहेत. आंतराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा कर्जदार देश अर्जेंटिना हा आहे. IMF चे सुमारे 46 अब्ज कर्ज अर्जेंटिनाने घेतलेले आहे. त्यांनतर दुसरा सर्वात मोठा कर्जदार देश हा इजिप्त असून, त्यांनी IMFचे 18 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. तिसऱ्या क्रमांकावर युक्रेन हा देश असून, रशियाशी युद्ध सुरु झाल्यापासून या देशाची आर्थिक परिस्थिती कमालीची बिघडली आहे. युक्रेनने IMF कडून 12.2 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे.
चौथ्या क्रमांकावर पाकिस्तान
पाकिस्तानवर सध्या IMF चे 7.4अब्ज डॉलरचे कर्ज आधीपासूनच आहे. येत्या 9 महिन्यात पाकिस्तानला नाणेनिधीकडून अतिरिक्त 3 अब्ज डॉलरचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानवर एकूण 10.4 अब्ज डॉलरचे कर्ज असणार आहे. सद्यघडीला इक्वेडोर हा देश चौथ्या क्रमांकावर असून, त्या जागी आता पाकिस्तान लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर असणार आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानात आलेला विनाशकारी पुरामुळे तेथील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच बदलत्या राजकीय उलथापालथीमुळे देखील तेथील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.