Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oracle layoff: आता ओरॅकल दाखवणार शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता, नवे ऑफरलेटर्सही थांबवले

Oracle layoff: आता ओरॅकल दाखवणार शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता, नवे ऑफरलेटर्सही थांबवले

Image Source : www.computerworld.com

Oracle layoff: जागतिक स्तरावर विविध आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असताना यात आता आणखी एका कंपनीचं नाव जोडलं गेलं आहे. आयटी कंपनी ओरॅकल आता आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

ओरॅकल या टेक फर्मला जागतिक मंदीचा (Recession) फटका बसला आहे. यावेळी त्यांचा आरोग्य विभाग (Health department) या निशाण्यावर आल्याचं दिसत आहे. ओरॅकल आपल्या हेल्थ युनिटमधून शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर (Software) क्षेत्रातली ही दिग्गज कंपनी नव्या नोकरीच्या ऑफरदेखील रद्द करत आहेत. काही जागा कमी केल्या जात आहेत. अमेरिकन कंपन्यांमधली कर्मचाऱ्यांच्या छाटणीचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. आता वाढती महागाई आणि वाढत्या व्याजदरामुळे (Interest rate) कॉर्पोरेट कंपन्या झपाट्यानं कर्मचाऱ्यांची संख्या कमी करताना दिसून येत आहेत.

सर्नरसोबतचा करार

ओरॅकलच्या सर्नर (Cerner) डिव्हिजननं यूएस डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेयर्स ऑफिससोबत करार केला. रुग्णांची आरोग्य माहिती साठवण्यासाठी आणि मॅनेज करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी प्रामुख्यानं हा करार करण्यात आला आहे. मात्र सर्नर सॉफ्टवेअरमधल्या त्रुटींमुळे अनेक रुग्ण प्रभावित झाले. त्यानंतर यूएस संरक्षण विभागानं कॉन्ट्रॅक्ट स्थगित केला. हेल्थ डिपार्टमेंटमधली ही कर्मचारी कपात याच वादग्रस्त भागीदारीशी संबंधित असू शकते.

कोणत्या कंपन्यांना ठोकणार टाळे?

एका अहवालानुसार, ओरॅकल प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी चार आठवडे आणि एका अतिरिक्त आठवड्याच्या सशुल्क सुट्टीच्या दिवसांच्या समतुल्य पैसे देईल. ओरॅकल तिच्या यूएस आणि युरोपीय कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, कंपनीचा भारतातदेखील मोठा कर्मचारीवर्ग आहे. आता या कर्मचारी कपातीत नेमके किती कर्मचारी प्रभावित झालेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर भारतातल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात कंपनीचं नेमकं धोरण काय असणार आहे, हेही अजून समजू शकलेलं नाही.

बाधित कर्मचाऱ्यांनी पाठिंबा

सर्नरचे माजी कर्मचारी आणि हेल्थ टेक्नॉलॉजी ग्रुपच्या सदस्यांनी या कपात होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. यासाठी लिंक्डइनचा आधार घेण्यात आला आहे. सर्नर इथल्या प्रोफेशनल सर्व्हिसच्या माजी व्हाइस प्रेसिडेंट कॅथी शोइनिंग यांनी याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. लिंक्डइनवर त्यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. त्यात त्या म्हणाल्या, की मला तुमच्याबद्दल खेद वाटतो, पण इथे मदत करण्यासाठी आहे. सर्नर ही एकेकाळची एक चांगली कंपनी होती. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवण्यात आलं. आता ते करा ज्यात तुम्ही सक्षम आहात, असं त्यांनी लिहिलं आहे.

लिंक्डइन यूझर्सच्या पोस्ट

लिंक्डइन यूझर्स विवियन रामोसनं एका पोस्टमध्ये सांगितलं, की तो कंपनीत 8 महिने काम करत होता. त्यानं एका वेगळ्या पोस्टमध्ये, कंपनीतून अचानक बाहेर पडण्याची घोषणा केली. शोइनिंग यांच्या पोस्टवर त्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. आज ज्या लोकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे, त्यांच्यापैकी मी एक आहे. मला अत्यंत दु:ख झालं आहे. सुमारे 7 महिन्यांपूर्वी मी सुरुवात केली होती. काम करताना खूप चांगलं वाटत होतं. मॅनेजमेंटकडून मला खूप पाठिंबादेखील मिळाला. मला जे आवडतं ते मिळवण्यास मी उत्सुक आहे. या मोठ्या कर्मचारी कपातीचा फटका बसलेल्या सर्वांना नवीन काहीतरी करण्यासाठी शुभेच्छा देतो, असं त्यानं म्हटलं आहे.

कर्मचाऱ्यांना 'लिंक्डइन'चा आधार

खर्च कमी करण्याचा निर्णय ओरॅकलनं घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ओरॅकलनं साधारणपणे 3000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. आपल्या भारत विभागातल्या कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी करण्यात आलं होतं. कंपनीनं सध्या पगारवाढ आणि पदोन्नती थांबवली आहे. तर आता या परिस्थितीत अनेक माजी कर्मचारी नवीन नोकऱ्या शोधण्यासाठी लिंक्डइनकडे वळाले आहेत.