Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नागपूर महानगर पालिका करणार गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या

Pradhan Mantri Awas Yojana

Image Source : www.nagpurtoday.in

Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगर पालिकेच्या वतीने, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, कामठी मार्गावरील वांजरा येथे 'स्वप्ननिकेतन' प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत 480 फ्लॅट्स ऑनलाईन पद्धतीने विक्रीकरिता उपलब्ध असणार आहे. एका फ्लॅटची किंमत 11 लाख 51 हजार रुपये आहे.

Pradhan Mantri Awas Yojana : नागपूर महानगर पालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामठी मार्गावर 'स्वप्ननिकेतन' हा घरकुल प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातील 480 फ्लॅट्सच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे.

'स्वप्ननिकेतन' प्रकल्पाअंतर्गत देण्यात येणाऱ्या फ्लॅट्सची किंमत 11 लाख 51 हजार 845 रुपये आहे. परंतु, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जात असल्याने 9 लाख 1 हजार 845 रुपयेच पडणार आहे. या फ्लॅट्सचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे.

फ्लॅटची एकूण किंमत 11 लाख 51 हजार

कामठी रोडवरील 'स्वप्ननिकेतन' प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्च महिन्यातच पार पडले होते. आता या प्रकल्पाचे कार्य सुरू झालेले आहे. 'स्वप्ननिकेतन' प्रकल्पाअंतर्गत येणारा फ्लॅट 303.65 चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे. त्याअंतर्गत एक बेडरुम, हॉल आणि किचन अशी सुविधा असणार आहे. फ्लॅटची एकूण किंमत 11 लाख 51 हजार 845 रुपये आहे.

240 फ्लॅट राखीव

प्रकल्पातील 480 फ्लॅट्समधील 240 फ्लॅट राखीव आहे. यात 13 टक्के अनुसूचित जाती, 7 टक्के अनुसूचित जमाती, 30 टक्के इतर मागास प्रवर्ग आणि 5 टक्के समांतर आरक्षण (Parallel Reservation) दिव्यांग प्रवर्गाकरिता (Disability Category) राखीव आहेत.

काय असणार सुविधा?

'स्वप्ननिकेतन' प्रकल्पामध्ये उद्यान, कम्युनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा पंपाला लागणाऱ्या विजेसाठी सोलर पॅनलची सुविधा आणि ड्रेनेज सिस्टीमची सुविधा असणार आहे.

कुठे कराल अर्ज?

नागरिकांना या फ्लॅटसाठी मनपाच्या www.nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेत स्थळावरुन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर नागरिकांनी 25 जूनपर्यंत अर्ज करुन या प्रकल्पातील फ्लॅटसाठी नोंदणी करायची आहे. इतर संपूर्ण महत्वाची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड द्यावे लागेल. सोबतच बँक पासबुक, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आणि सांगण्यात आलेले इतर दस्तावेज आवश्यक आहे. अर्ज नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी अद्याप बाकी आहे. तर अर्जासाठी दोन हजार रुपये शुल्क ऑनलाईन जमा करावे लागतात.