भारतातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमधील शेतकऱ्यांना कांद्याचे दर कोसळल्याने मोठे नुकसान सोसावे लागत आहे.सलग दुसऱ्या वर्षी कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने इथला कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पुढल्या हंगामात कांद्याची शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.यासंदर्भात नुकताच महामनीच्या टीमने थेट लासलगावमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांद्याचे अर्थकारण जाणून घेतले.
भाव स्थिर असतील तर शेतकऱ्यांसाठी कांद्याची शेती फायदेशीर आहे, असे मत लासलगावमधील कांदा उत्पादक शेतकरी डॉ. केंगे यांनी महामनीशी बोलताना व्यक्त केले.बियाणे जास्त उपलब्ध असेल तर कांद्याच्या किंमतीवर परिणाम होतो.मागच्या वर्षी 3500 ते 4000 रुपये किलो बियाण्याचा भाव होता.आता 1700 रुपये असल्याचे डॉ. केंगे यांनी महामनीशी बोलताना सांगितले. कांद्याला प्रती क्विंटल 800 ते 1000 रुपये खर्च येतो. त्याचबरोबर 10500 रुपये प्रती एकरी कांदा काढणीचा खर्च आहे.एक किलो कांद्याचा उत्पादन खर्च हा शेतकऱ्याला 8 ते 10 रुपये इतक येतो असे डॉ. केंगे यांनी सांगितले.
मागच्या हंगामात कांदा 300 ते 350 रुपये क्विंटलने विकला गेला होता.यामुळे इथल्या शेतकऱ्याला भरपूर नुकसान झाले होते,असे डॉ.केंगे यांनी सांगितले. कांद्याचा भाव कोसळत असले तरी शेतकऱ्यांना या परिस्थितीला सामोरे जाण्यावाचून पर्याय नाही.कारण कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये फार काळ ठेवू शकत नाही.तो कोल्ड स्टोरेजला ठेवला तर तो लवकर सडतो.कोल्ड स्टोरेजमध्ये आर्द्रता वाढते आणि कांदा टिकत नाही, असे डॉ. केंगे यांनी सांगितले.
मागील काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारपेठेत मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने अनेकदा या भागात आंदोलने झाली. सरकारने हमीभाव वाढवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लासलगाव मार्केटमध्ये कांदे घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले की कांद्याला एकरी उत्पादन खर्च 70000 रुपये खर्च झाला. पण आता मार्केटला कांदा विकला तर 35 ते 40 हजार रुपये इतके मिळाले. कांद्याचे भाव स्थिर ठेवावेत अशी मागणी या शेतकऱ्याने सरकारकडे केली.
लासलगाव बाजार समितीची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीची आहे.या बाजार समितीला देशभरात एक वेगळी ओळख असल्याचे येथील कांदा लिलाव करणाऱ्या व्यापाऱ्याने सांगितले.लासलगावात नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार, बारामती, मध्य प्रदेशातील शिरपूर पट्ट्यातून कांद्या विक्रीसाठी येतो. कांदा व्यापाऱ्याकडे आल्यावर गोदामात साठवला जातो. त्याची छाटनी केली जाते आणि पॅकिंग केली जाते.
व्यापाऱ्यांसाठी कांद्याची मालवाहतूक हा कळीचा मुद्दा आहे. इथून कांदा गाडीने पाठवला तर त्याचा खर्च अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेने सुविधा वाढवावी, अशी मागणी इथल्या व्यापाऱ्यांनी केली आहे. लासलगावमधून बिहारमधील पटना मार्केटला माल पाठवण्यासाठी प्रती किलोला 5 ते 5.25 रुपये भाडे आहे. कोलकात्यासाठी मालवाहतुकीचा दर 5 ते 5.50 रुपये इतका आहे. मात्र रेल्वेने कांदा पाठवला तर वाहतुकीचा खर्च निम्म्याने कमी होईल.रेल्वेने कांदा अवघा 2 ते 2.50 रुपयांत पाठवला जाऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांद्याची पॅकेजिंग, ग्रेडिंग आणि लोडिंग ही सर्व कामे कामगारांवर अवलंबून आहेत.त्यामुळे या ठिकाणी रोजगार प्रचंड आहे.लासलगावातील कांद्याला जीआय मानांकन असल्याने या कांद्याची प्रतवारी चांगली आहे.देशभरात येथील कांद्याला मागणी असते,असे त्यांनी सांगितले.
लासलगावात दररोज 1 कोटींची उलाढाल
शेतकरी लासलगाव समितीत ट्रॅक्टरने कांदा घेऊन येतात.त्यावर बोली लावली जाते.जो जास्त बोली लावतो त्याला कांदा दिला जातो. हंगामात दररोज शेकडो ट्राली कांदा बाजार समितीत येतो. कांद्याचे लिलाव येथे पार पडतात. देशभरातले व्यापारी या ठिकाणी बोली लावतात. त्याशिवाय कांदा बाहेर देशात निर्यात देखील केला जातो.वेगवेगळ्या देशांनुसार पॅकेजिंग करुन कांदा एक्सपोर्ट केला जातो. कांदा साईजनुसार एक्सपोर्ट पाठवला जातो.कोलंबो, दुबई, मलेशिया यांना साईजनुसार कांदा पाठवला जातो. दररोज सरासरी 16000 क्विंटल मालाची खरेदी-विक्री झाली.सरासरी 300 रुपये प्रती क्विंटल किंवा 7 ते 8 रुपये किलोचा भाव धरला तर 1 कोटी 28 लाख रुपयांची दैनंदिन उलाढाल होते, असे इथल्या एका व्यापाऱ्याने सांगितले.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            