OnePlus ही स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली होती. चक्क शून्य रुपयांत आपल्या ग्राहकांना वायरलेस चार्जर कंपनीने उपलब्ध करून दिले होते. खरे तर या ऑफरची कंपनीने कुठेच प्रसिद्धी केली नव्हती, मात्र ज्या ग्राहकांच्या नजरेत ही ऑफर पडली त्यांनी मात्र लगोलग चार्जर ऑर्डर केले आहे. मात्र ऑर्डर देऊनही युजर्सला हे चार्जर मिळणार नाहीये, याचे कारण समजून घेऊयात.
वनप्लस युजर्सला 30W वायरलेस चार्जर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर शून्य रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध होते. याची किंमत खरे तर 3,990 रुपये इतकी आहे. शून्य रुपयांत नाममात्र 49 रुपये शिपिंग चार्जसह ग्राहकांना हे चार्जर खरेदी करता आले आणि आता हे चार्जर आउट ऑफ स्टॉक दाखवले जात आहे. माल संपल्यानंतरही ग्राहकांनी कंपनीकडे शून्य रुपयाच्या या डीलबाबत सोशल मिडीयावर विचारणा सुरूच ठेवली आहे.
कंपनीचे स्पष्टीकरण
खरे तर अशी कुठलीही ऑफर कंपनीकडून देण्यात आली नव्हती किंवा ग्राहकांना याबाबत सांगण्यात आले नव्हते. वेबसाईटच्या काही तांत्रिक अडचणीमुळे 3,990 रुपये किमतीच्या या चार्जरची किंमत शून्य रुपये दाखवली जात होती आणि त्यावर केवळ 49 रुपये शिपिंग चार्ज आकारले जात होते.
धडाधड ऑर्डर येत असल्याचे कंपनीच्या लक्षात येताच कंपनीने याची शहानिशा केली आहे आणि ज्या ग्राहकांनी ऑर्डर दिली आहे अशांच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 49 रुपये शिपिंग फी भरलेल्या ग्राहकांना त्यांचे पैसे परत दिले जात आहेत.
ग्राहकांना मेल, 800 रुपयांचे कुपन
ज्या ग्राहकांच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या, त्यांना त्यांची ऑर्डर रद्द झाल्याबाबत कंपनीने मेल देखील पाठवला आहे. सदर 30W वायरलेस चार्जरबाबत तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे त्याची किंमत शून्य रुपये दाखवली जात होती असे स्पष्टीकरण देखील मेलमध्ये देण्यात आले आहे. याशिवाय ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीकडून माफी देखील मागण्यात आली आहे.
ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास कायम रहावा म्हणून, ज्यांच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत अशा ग्राहकांना 800 रुपयांचे स्पेशल कूपन देखील OnePlus ने दिले आहे. 800 रुपयांचे हे स्पेशल कूपन 1,500 रुपये किंवा त्यावरील खरेदीवर ग्राहकांना रिडीम करता येणार आहे.