पॅन किंवा कायम खाते क्रमांक (Permanent Account Number) हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हे एक महत्त्वाचं कायदेशीर ओळखपत्र आहे. आयकर विभागासाठी (Income tax department) हे तुमचं महत्त्वाचं दस्तावेज आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की कोणतीही भारताची नागरिक केवळ एकच पॅन कार्ड ठेवू शकते. दोन पॅन कार्ड ठेवण्याची परवानगी नाही. जर असं झालं आणि तुम्ही दोन पॅनकार्डांसह पकडला गेलात तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई, दंड (Penalty) करू शकतो.
Table of contents [Show]
तरतूद काय?
आयकर विभाग हा उत्पन्नाशी संबंधित सर्वच विषयांवर काम करणारा विभाग आहे. या विभागाच्या नियमांनुसार, तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असतील तर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
दोन पॅनकार्डांची कारणं?
दोन पॅन कार्ड असण्यामागे अनेक कारणं असू शकतात...
विविध अॅप्लिकेशन -
तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज केला मात्र ते वेळेवर पोहोचलं नाही. त्यामुळे मग तुम्ही पुन्हा अर्ज केला. अशा परिस्थितीमध्ये दोन-दोन पॅन कार्ड तयार होऊ शकतात.
पॅनमध्ये काही चूक असल्यास -
तुमच्या पॅनमधल्या तपशीलात काही चूक झाली असेल आणि ती तुम्हाला सुधारायची आहे, अशा स्थितीत तुम्ही नवीन पॅनसाठी अर्ज केल्यास...
लग्नानंतर नवं पॅन -
लग्न झाल्यानंतर महिला बहुधा त्यांचं आडनाव बदलतात. त्यानंतर ते त्यांच्या पॅनमध्येही बदलावं लागतं. अशावेळी दोन कार्ड तयार होऊ शकतात.
फसवणुकीचा उद्देश -
काही लोक फसवणुकीच्या, बेकायदेशीर कामांसाठी अनेक पॅनकार्ड सोबत ठेवतात.
कसं सरेंडर करावं पॅन?
ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीनं पॅन सरेंडर करण्यासाठी अर्ज करता येवू शकतो.
ऑनलाइन सरेंडर करण्याची पद्धत
तुम्हाला पॅन बदलण्याचा विनंती अर्ज भरावा लागेल. त्या अर्जाच्या वरच्या स्थानी तुम्हाला तुम्ही वापरत असलेला पॅन क्रमांक टाकावा लागेल. सेक्शन 11मध्ये तुम्हाला दुसऱ्या पॅनचा तपशील द्यावा लागेल. त्याची एक प्रतदेखील जोडावी लागेल आणि नंतर एनएसडीएल (NSDL) वेबसाइटला व्हिझीट करून सबमिट करावी लागेल.
ऑफलाइन सरेंडर करण्याची पद्धत
ऑफलाइन सरेंडर करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 49A भरावा लागणार आहे. फॉर्ममध्ये सरेंडर करण्यासाठी पॅन कार्डचे पूर्ण डिटेल्स टाकावे लागतील. संपूर्ण भरलेला हा फॉर्म तुमच्या जवळच्या यूटीआय (UTI) किंवा एनएसडीएल टीआयएन (National Securities Depository Limited Tax Information Network) सुविधा केंद्रात सबमिट करावं. त्याची पोचपावती जपून ठेवावी. तुमच्या अधिकारक्षेत्रात असेसिंग ऑफिसर असलेल्या अधिकाऱ्याला पत्र लिहावं. तुमच्या विभागातला किंवा क्षेत्रातला न्यायाधिकार अधिकारी कोण आहे, हे तुम्ही शोधू शकता. आयकर विभागाच्या वेबसाइटवर तुम्हाला यासंदर्भातली माहिती मिळेल.
पॅन कार्डवरची सर्व माहिती द्यावी
ऑफलाइन फॉर्म भरत असताना संबंधित पत्रात तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर टाकलेली सर्व माहिती द्यावी लागणार आहे. सरेंडर करायच्या डुप्लिकेट पॅनकार्डचे डिटेलही द्यावे लागतील. तुम्ही डुप्लिकेट कार्डची प्रत आणि एनएसडीएल टीआयएनकडून (NSDL TIN) मिळालेली पोचपावती देखील अटेस्ट करावी आणि ती सबमिट करावी.