फास्टॅग नेमके काय काम करते हे काही वेगळे सांगायची गरज नाहीये. आजकाल टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य आहे. अनेकदा असे होते की तुम्ही टोल नाक्यावर गाडी नेता आणि फास्टॅग स्कॅन होत नाही, त्यामुळे तुमचा वेळ जातो. कधी कधी तुम्ही फास्टॅग रिचार्ज करायला विसरता त्यामुळे देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेसे पैसे न ठेवल्यामुळे एका वाहन चालकाला थोडेथोडके नव्हे तर तब्बल 9 कोटींचे बिल आले आहे. काय म्हणता, विश्वास बसत नाहीये ना? परंतु असे प्रकरण हरियाणामधील एका व्यक्तीसोबत घडले आहे. तुमचा फास्टॅगच्या बाबतीत असे काही होऊ नये असे जर तुम्हांला वाटत असेल तर हा लेख वाचाच!
काय आहे हे प्रकरण?
फास्टॅग वॉलेटमध्ये अपुरी रक्कम असल्याचे कारण देत हरियाणामधील एका व्यक्तीला नऊ कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्या फास्टॅग वर हिस्सारजवळील मायर टोल प्लाझाचा वापर केल्याबद्दल 9 कोटी रुपये इतकी रक्कम देय असल्याचे सांगितले गेले. या व्यक्तीला ही रक्कम बघून धक्काच बसला.
सदर व्यक्तीचा फास्टॅग हा पेटीएमशी लिंक होता. या व्यक्तीने पेटीएमशी संपर्क साधला असता FASTag खात्यात अपुरी शिल्लक असल्यामुळे पेटीएमने ब्लॅकलिस्ट केले आहे, असे उत्तर त्याला मिळाले. NHAI च्या हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतर तेथून देखील काहीच उत्तर मिळाले नाही. त्यांनतर या व्यक्तीने सोशल मिडीयावर याबद्दल पोस्ट लिहिली आणि त्यामुळे अनेकांना या घटनेची माहिती मिळाली.
A vehicle owner and Paytm FASTag customer recently claimed to have been charged ₹9 crores for using an NHAI toll booth. On the TeamBHP forum, a user named 'gsratta' posted about the event.
— truth. (@thetruthin) June 16, 2023
The money was charged for his travel through the Mayar Toll Plaza in Hisar, Haryana,… pic.twitter.com/8Uk3AtakJH
त्यांनतर 90 रुपयांच्या टोल रकमेच्या ऐवजी तांत्रिक बिघाडामुळे ती रक्कम 9 कोटी दाखवली जात असल्याचे पेटीएमने या व्यक्तीला सांगितले. मात्र तोपर्यंत या वाहन मालकाला नाहक मानसिक त्रास सहन कारावा लागला.
तुम्ही काय काळजी घ्यायला हवी?
खरे तर सदर प्रकरणात तांत्रिक अडचण होती म्हणून 90 रुपयांच्या ऐवजी 9 कोटींची रक्कम दाखवली गेली. जर फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेशी रकम ठेवली असती तर कदाचित या व्यक्तीचा मानसिक त्रास झाला नसता. वेळोवेळी जर तुम्ही तुमचे फास्टॅग वॉलेट रिचार्ज केले नाही तर तुमच्या गाडीचा FASTag काळ्या यादीत टाकला जाऊ शकतो. होय, एकदा की तुमचा फास्टॅग काळ्या यादीत गेला,तर त्यानंतर तुम्ही टोल पेमेंटसाठी टॅग वापरू शकत नाही.
FASTag काळ्या यादीत टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे फास्टॅग वॉलेट रिचार्ज नसणे हे होय. तुमच्या गाडीचा वापर फार नसला तरीही तुम्ही फास्टॅग वॉलेट रिचार्ज केलाच पाहिजे. त्यामुळे संभाव्य अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसेच फास्टॅगचा वापर न करता जेव्हा तुम्ही रोख पैसे देऊन टोल भरता तेव्हा तुम्हांला दुप्पट पैसे भरावे लागतात हेही लक्षात असू द्या.
FASTag काळ्या यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे?
तुमच्या FASTag ची सद्यस्थिती तपासण्याचा एक सोपा पर्याय म्हणजे FASTag च्या अधिकृत पोर्टलला भेट देणे. तुमची टॅग स्थिती तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- स्टेप 1: https://www.npci.org.in/ या वेबसाइटला भेट द्या .
- स्टेप 2: "What we Do" ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा.
- स्टेप 3: ड्रॉप-डाउन मेनूमधून "NETC FASTag" वर क्लिक करा.
- स्टेप 4: पुढे "Check Your NETC FASTag Status" वर क्लिक करा.
- स्टेप 5: तुमचा वाहन नोंदणी क्रमांक किंवा FASTag आयडी लिहा. स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा कोड भरा आणि "Check Status" बटणावर क्लिक करा.
- स्टेप 6: यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनाचा FASTag सक्रिय आहे किंवा निष्क्रिय आहे याचीं माहिती मिळेल. तसेच त्यासंबंधी जर कारवाई केली गेली असेल तर ती देखील तुम्हांला स्क्रीनवर दिसेल.