ओएलएक्स या ऑनलाईन मार्केटप्लेस कंपनीने त्यांच्या तब्बल 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने याआधीच त्यांचे ऑटोमोबाईल युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे साहजिकच कर्मचारी कपात केली जाईल असा कयास होता. सध्या कंपनी खरेदीदार आणि गुंतवणूकदार यांच्या शोधात असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेतील सध्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील मोठमोठ्या बँका डबघाईला येत असल्याकारणाने उद्योगजगताला देखील मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याआधी मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन सारख्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी 2023 मध्ये जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15% कर्मचारी कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता.
OLX समूहाने सध्या 800 कर्मचाऱ्यांना निष्कासित केले असले तरी येणाऱ्या काळात आणखी कर्मचाऱ्यांची गच्छंती होऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
OLX ग्रुपच्या प्रवक्त्यांनी या निर्णयाची पुष्टी केली असून OLX Automobiles युनिट बंद केल्यानंतरचा हा परिणाम आहे असे सांगितले आहे. जगभरात जवळपास 30 देशांत OLX चा विस्तार आहे.
Olx Group cuts 800 jobs as it shuts down some markets https://t.co/rD3QFt7dQ7 by @jagmeets13
— TechCrunch (@TechCrunch) June 20, 2023
आशियाई देशात ऑटोमोबाईलची मागणी घटली
भारत, इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील ग्राहकसंख्या अधिक आहे. सुरुवातीच्या काळात परवडणाऱ्या दरात जुनी वाहन खरेदी करण्यासाठी भारतीयांनी पसंती दर्शवली होती. मात्र जुन्या वाहनात होणारे वारंवार बिघाड, इंजिनच्या समस्या या कारणामुळे ग्राहकांनी OLX कडे पाठ फिरवली होती. तसेच गेल्या काही वर्षांपासून भारतासह अन्य आशियाई देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढते आहे. या वाहनांवर सरकारी सबसिडी देखील दिली जात असल्यामुळे नवीन वाहन खरेदी करणे लोक पसंत करत आहेत. या कारणांमुळे देखील OLX चा व्यापार थंडावला होता. येत्या काळात भारत, इंडोनेशिया या देशांमध्ये देखील कर्मचारी कपात केली जावू शकते आणि इथला व्यापार बंद केला जावू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.
एवढेच नाही तर ग्राहसंख्या घटल्यामुळे कंपनीने कोलंबिया, मेक्सिको आणि अर्जेंटिना येथील ऑटोमोबाईल युनिट देखील बंद केले आहे. इतर देशांमध्ये देखील अशीच अनिश्चितता कायम राहिल्यास तेथील व्यापार देखील कंपनीला बंद करावा लागू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे कंपनीला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकन आणि युरोपियन खंडातील काही देश सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. आर्थिक मंदीचे सावट असल्यामुळे कर्मचारीवर्ग देखील अस्वस्थ आहे. त्यामुळे वाहन खरेदी करणे सध्याच्या काळात टाळले जात आहे. याचा सरळसरळ परिणाम का ऑटोमोबाईल क्षेत्रावर बघायला मिळतो आहे.
ऑटोमोबाईल संबंधित वस्तू सोडल्यास फर्निचर, इलेक्ट्रॉनिक समानाची खरेदी विक्री समाधानकारक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.