कोव्हीड निर्बंधांतून मुक्तता आणि सणासुदीतील ऑफर्सचा लाभ घेत ग्राहकांनी नोव्हेंबरमध्ये वाहन खरेदीची हौस भागवली. नोव्हेंबर महिन्यात भारतात तब्बल 23 लाख 80 हजार वाहनांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक 18 लाख 47 हजार दुचाकींची विक्री झाली असून तीन लाख कार्सची विक्री झाली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिशन (Federation of Automobile Dealers Associations-FADA)ने नोव्हेंबरमध्ये वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. मार्च 2020 वगळता नोव्हेंबर महिन्यात भारतात वाहन विक्रीने नवा उच्चांक नोंदवला असल्याचे संघटनेने म्हटले आहे. दुचाकी, तीन चाकी, प्रवासी वाहने (कार), टॅक्टर आणि कर्मर्शिअल वाहने यांच्या एकूण विक्रीत 26% वाढ झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात लग्नसराईचा हंगाम पूर्ण तेजीत होता. याच तेजीला वाहनांची बाजारपेठ देखील पूरक ठरली. 14 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या काळात भारतात तब्बल 32 लाख विवाह सोहळे आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने वाहन खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. ग्राहकांनी तीन लाखांहून अधिक मोटारींची खरेदी केल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. लग्न सराईत सर्वसाधारणपणे मुलीच्या पालकांकडून होणाऱ्या जावयाला मोटार कार किंवा मोटारसायकल भेट म्हणून देण्याची पद्धत आहे. त्यामुळेच नोव्हेंबरमधील वाहन विक्रीची आकडेवारी वाढल्याचे FADA ने म्हटलं आहे.
गेल्या महिन्यात 1847708 दुचाकींची विक्री झाली. त्यात 23.6% वाढ झाली. तीन चाकी वाहनांच्या विक्रीत 80.34% वाढ झाली असून 74473 वाहनांची विक्री झाली. कारचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात 300922 कार विक्री झाल्या आहेत. मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कमर्शिअल व्हेइकलच्या विक्रीत देखील 32.8% वाढ झाली आहे. 79369 कमर्शिअल व्हेइकलची विक्री झाली.
वाहनाचा प्रकार | विक्री (नोव्हें.2022) | वाढ (नोव्हें.2021च्या तुलनेत) | वाढ (नोव्हें.2020च्या तुलनेत) | वाढ (नोव्हें.2019च्या तुलनेत) |
दुचाकी वाहने | 18,47,708 | 23.6% | 20.96% | -0.86% |
तीन चाकी वाहने | 74,473 | 80.34% | 195.47% | 3.68% |
कार | 3,00,922 | 21.31% | -1.78% | 5.12% |
ट्रॅक्टर | 77,993 | 56.81% | 41.65% | 61.34% |
कमर्शिअल व्हेइकल | 79,369 | 32.8% | 51.87% | 6.37% |
एकूण | 23,80,465 | 25.71% | 21.05% | 1.52% |