भारतीयांनी यूपीआय पेमेंटला (Unified Payments Interface payments) प्रथम पसंती दिली असली तरी आता लोकांमध्ये आणखी एका पेमेंट्सची क्रेझ दिसून येत आहे. क्रेडिट कार्ड (Credit card) ही एक नवीच पद्धत आता वापरात असल्याचं आणि वाढल्याचं प्रमाण दिसून आलं आहे. वर्ष 2023मध्ये या पर्यायात जोरदार तेजी आली आहे. लोक रेशनच्या वस्तूंसाठी क्रेडिट कार्डद्वारे लहान पेमेंटदेखील करताना दिसून येत आहेत. मे महिन्यात क्रेडिट कार्ड पेमेंटनं नवा विक्रम निर्माण केला आहे.
Table of contents [Show]
मेमध्ये विक्रमी खर्च
मे महिन्यात क्रेडिट कार्डचा खर्च विक्रमी 1.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, रिझर्व्ह बँक सातत्यानं बँकांना असुरक्षित कर्जे कमी करण्याचं आवाहन करत आहे. मात्र क्रेडिट कार्डकडे लोकांचा कल कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट त्यात वाढच नोंदवली जात आहे.
छोट्या खर्चासाठी क्रेडिट कार्डला पसंती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) ताज्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्डवरचा खर्च किंवा देय रक्कम मागच्या आर्थिक वर्षात एकाच कक्षात राहिली. यंदा त्यात मासिक आधारावर पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या वर्षी वापरात असलेल्या क्रेडिट कार्डांची संख्या साधारणपणे जानेवारीपासून 50 लाखांहून अधिकनं वाढली आहे. मेमध्ये ती विक्रमी 8.74 कोटींवर पोहोचली आहे. नवीन कार्डांबद्दल बोलायचं झालं, तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत 20 लाख कार्ड वापरण्यात आले आहेत.
अॅक्टिव्ह कार्डांच्या संख्येत वाढ
जानेवारी 2023मध्ये देशात 8,24 कोटी सक्रिय क्रेडिट कार्ड्स होती. ही संख्या प्रंचड प्रमाणात वाढताना दिसत आहे. फेब्रुवारीमध्ये 8.33 कोटी कार्ड, मार्चमध्ये 8.53 कोटी कार्ड, एप्रिलमध्ये 8.65 कोटी कार्ड्स झाली. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, वित्तीय वर्ष 2022-23मध्ये क्रेडिट कार्डवरचा खर्च संपूर्ण वर्षासाठी 1.1-1.2 लाख कोटी रुपये राहिला. मात्र चालू आर्थिक वर्षात तो मे महिन्यात 1.4 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सेंट्रल बँकेनं सांगितल्यानुसार, क्रेडिट कार्डवरचा सरासरी खर्चदेखील 16,144 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला आहे.
कोणत्या बँकेची क्रेडिट कार्ड्स अधिक?
एचडीएफसी बँकेकडे मे महिन्यात सर्वाधिक 1.81 कोटी सक्रिय ठेवी होत्या. 28.5 टक्के शेअरसह क्रेडिट कार्ड थकबाकीच्या बाबतीत बँक अव्वल स्थानावर राहिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर 1.71 कोटी एसबीआय कार्ड वापरात होते. यानंतर आयसीआयसीआय बँकेची 1.46 कोटी कार्ड्स वापरात होती. अॅक्सिस बँक 1.24 कोटी क्रेडिट कार्डांसह चौथ्या स्थानावर होती.