Market Opening Bell: सलग चार दिवसांपासून तेजीत असणार शेअर मार्केट आता पुन्हा खाली आले. आज (गुरुवार) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण (RBI MPC) जाहीर करणार आहे. त्याचा परिणाम भांडवली बाजारावर दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 100 अंकानी खाली आला असून 59,593 वर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 27 अंकांनी खाली आला आहे. सोबतच क्षेत्रनिहाय निर्देशांकही खाली आले आहेत.
मागील चार कामकाजाचे दिवस शेअर बाजारा तेजीत होता. काल (बुधवार) निफ्टी निर्देशांक 159 अंकांनी वाढून 17550 अंकांवर बंद झाला होता. तर सेन्सेक्स 580 अंकांनी वाढून 59689 वर बंद झाला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी खाली येऊन 81.95 झाला आहे. मात्र, काल 40 पैशांनी रुपया मजबूत झाला होता.
बँका आणि आर्थिक संस्थांची कर्जवितरणाची आकडेवारी चांगली असल्याने काल बँक निफ्टी तेजीत होता. मात्र, आज बँक निफ्टी 130 अंकांनी कोसळून 40,868 वर आला आहे. निफ्टी इंडेक्समधील लार्सन अँड टुब्रो, बीपीसीएल, अदानी एंटरप्राइजेस, बजाज ऑटो आणि डॉक्टर रेड्डी चे शेअर बाजार सुरू होताच वरती गेले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, हिरो मोटो कॉर्प, नेस्ले इंडिया आणि एचसीएल टेक आणि कोल इंडियाचे शेअर आपटले. फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सरासरी 4 टक्क्यांनी वर गेले आहेत.
RBI च्या पतधोरणावर सर्वांच लक्ष
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज द्विमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी 25 बेसिस पॉइंटने व्याजदरवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील सलग पाच पतधोरणात 250 बेसिस पॉइंटने दरवाढ झाली आहे. RBI ने यापुढे दरवाढ करू नये, असे विविध क्षेत्रांचे म्हणणे आहे. मात्र, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय पावले उचलू शकते. जर दरवाढ झाली तर विविध प्रकराची कर्ज महाग होऊन बाजारातील वस्तू आणि सेवांची मागणी कमी होऊ शकते.
चौथ्या तिमाहीचे निकाल
नुकत्याच संपेलेल्या 2022-23 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. तिसऱ्या तिमाहीत उद्योगांनी निराश कामगिरी केली होती. मात्र, चौथ्या तिमाहीत सुधारणा होईल अशी अपेक्षा केली जात आहे. टीसीएस, इन्फोसिस कंपन्यांचे निकाल चांगले येण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून कंपन्या आपला नफा तोटा जाहीर करतील. तेव्हा बाजारातील चित्र आणखीस्पष्ट होईल.