निफ्टी मिडकॅप इंडेक्समधील कंपन्यांची घोडदौड सुरू असून या कंपन्यांना भाव वधारला आहे. गुंतवणुकदारांनीही खरेदीवर लक्ष केंद्रित केले असून या कंपन्यांचे शेअर्स वरती जात आहेत. निफ्टी मिडकॅप-150 आणि निफ्टी मिड कॅप-100 हे दोन्ही इंडेक्स सर्वोच्च पातळीवर पोहचले आहेत. स्थानिक बाजारातील स्थिती चांगली असल्याने येत्या काळात मिड कॅप कंपन्यांची प्रगती होत राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी-50 निर्देशांक येत्या काळात सर्वोच्च पातळीवर जाईल अशा बातम्या मागील काही दिवसांपासून येत आहेत. भारतीय भांडवली बाजारासाठी ही सकारात्मक बाब आहे. निफ्टी 50 निर्देशांक 19 हजार अंकांचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मिड कॅप कंपन्यांचे भावही तेजीत आहेत.
काल (20 जून) रोजी निफ्टी मिडकॅप-150 इंडेक्स आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत सर्वोच्च 13,256 अंकांवर पोहचला. मागील तीन महिन्यांपासून मिड कॅप इंडेक्स bullish ट्रेंड दर्शवत आहे. लार्ज कॅप इंडेक्सला मागे टाकत मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील वर्षभरात निफ्टी-50 आणि स्मॉल कॅप इंडेक्सला मागे टाकत मिड कॅप-150 इंडेक्सने 38 टक्क्यांनी प्रगती केली.
मिड कॅप इंडेक्स वाढीमागील कारण काय?
मिड कॅप कंपन्यांचा नफा मागील काही महिन्यांपासून वाढत आहे. सोबतच गुंतणुकदारांकडून शेअर्सची खरेदीही वाढली आहे. कंपन्यांचे मूल्यांकन योग्य किंमतीला होत असून अर्थव्यस्थेसंबंधित घटकही सकारात्मक आहेत. अमेरिकेतील कर्ज संकट, युरोपातील मंदीसदृश्य परिस्थिती, अमेरिका-चीन वाद आणि बाजारातील मागणी रोडावली असतानाही भारतीय भांडवली बाजाराने प्रगती केली.
भारतीय सेवा क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय बाजारात कायमच दबदबा राहीला आहे. सोबतच निर्मिती क्षेत्रही प्रगती करत आहे. भांडवली वस्तू, उद्योगांना आवश्यक वस्तूंची निर्मिती, ऑटो आणि ऑटो पार्ट्स कंपन्यांही नफ्यात आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारही चांगला नफा कमावत आहेत. त्यामुळे मीड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार गुंतवणूकदार करू शकतात.
म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक गुंतवणूक केलेल्या मिड कॅप कंपन्या कोणत्या
IDFC First बँक
अपोलो टायर्स
सीजी पावर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन
युनियन बँक ऑफ इंडिया
ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडिया
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन
भारत हेवी इलेक्ट्रिक्ल्स
इंडियन बँक
बँक ऑफ इंडिया
पंजाब नॅशनल बँक