राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज सोमवारी 26 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा 18000 अकांची पातळी गाठली. आज बाजार बंद होताना निफ्टी 207.80 अंकांच्या तेजीसह 18014 अंकांवर स्थिरावला. आजच्या तेजीत निफ्टी मंचावर फार्मा इंडेक्स वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात मोठी वाढ झाली. निफ्टीने 18000 अंकाची पातळी पुन्हा एकदा ओलांडल्यानंतर आता पुढे किती वाढणार याबाबत शेअर बाजार विश्लेषक वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत.
फायनान्शिअल आणि मिडकॅप इंडेक्समध्ये मोठी वाढ झाली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स 7.6% ने वधारला. यात युनियन बँकेचा शेअर 20% ने वधारला होता. मिडकॅप स्टॉक्समध्ये पुनावाला फिन या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. आज निफ्टी 50 मध्ये 39 शेअर तेजीसह बंद झाले. सर्वच शेअरमध्ये सरासरी 4% वाढ झाली. निफ्टीमध्ये इंड्सइंड बँक, एसबीआय, हिंदाल्को, टाटा स्टील, कोल इंडिया या शेअरमध्ये वाढ झाली. निफ्टीवर डिव्हीज लॅब, डीआरएल. नेस्ले, टाटा कन्झुमर या शेअरमध्ये घसरण झाली.
तांत्रिक कामगिरीचा विचार केला तर निफ्टीला 17650 ते 17680 अंकांच्या पातळीवर सपोर्ट आहे. त्याखाली निफ्टी कोसळला तर मग तो 17200 ते 17250 या दरम्यान ट्रे़ड करेल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. वरच्या स्तरावर नजिकच्या काळात निफ्टी 18050 ते 18100 अंकांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
बँक निफ्टी इंडेक्सने आज 42000 अंकांची पातळी ओलांडली. बँक निफ्टीला 43000 अंकांच्या पातळीवर सपोर्ट आहे असे एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधक कुणाल शाहा यांनी सांगितले. आयसीआयसीआय डायरेक्ट या ब्रोकरेज कंपनीच्या अंदाजानुसार निफ्टी 18400 अंकांपर्यंत वाढू शकते.
गोल्डमन सॅक्स या कंपनीने 2023 साठी निफ्टीचे 20500 अंकांचे टार्गेट ठेवले आहे. नोमुरेने निफ्टी 19030 अंक आणि मॉर्गन स्टॅन्लेने 19500 अकांची पातळी गाठेल, असे म्हटले आहे. यूबीएसने निफ्टी 18000 अंकांच्या पातळीवर राहील तर जेफरीज या कंपनीने पुढील वर्षभरात निफ्टी 18000 ते 19000 या दरम्यान राहील, असे म्हटले आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने निफ्टी 19500 अंकांचे टार्गेट आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 21200 अंकांचे टार्गेट ठेवले आहे.