यंत्रसामग्री निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवी योजना आणणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी याविषयी घोषणा केली आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीतील काउंसिल फॉर लेदर एक्सपोर्ट्सतर्फे आयोजित निर्यात पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना गौरविले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पादत्राणे आणि चामडे हे असे क्षेत्र आहे जिथे भारत जगात अग्रेसर होऊ शकतो. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेलही या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, यंत्रसामग्रीच्या निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी सरकार नवीन योजना आणणार आहे. नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये काउंसिल फॉर लेदर एक्सपोर्ट्सतर्फे आयोजित निर्यात पुरस्कार विजेत्यांच्या सत्कार समारंभात गोयल बोलत होते. कमी दर्जाचे उत्पादन भारतात येण्यापासून रोखण्यासाठी BIS प्रमाणपत्राचे गुणवत्ता नियंत्रण प्रमाणपत्रात रूपांतर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
ते म्हणाले की गुणवत्ता नियंत्रण मानकांची पूर्तता करण्यासाठी सरकार सहकार्य करण्यास आणि प्रयोगशाळा स्थापन करण्यास तयार आहे. ते पुढे म्हणाले, उद्योगाला त्रासदायक ठरणाऱ्या मानकांमध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चामडे आणि पादत्राणे उद्योगाची प्रचंड क्षमता ओळखली गेली आहे. हे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. पुढील 25 वर्षांसाठी नवीन उद्दिष्टे ठेवण्याचे आवाहन त्यांनी उद्योगांना केले.
फूटवेअर आणि लेदर क्षेत्रात भारताला भविष्य चांगले
पादत्राणे आणि चामडे (लेदर) हे असे क्षेत्र आहे जिथे भारत जगात अग्रेसर होऊ शकतो, असे केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल म्हणाले. चामडे उद्योग यावर्षी अधिक निर्यात करू शकेल. भारताने विविध देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) लाभ घेण्यास त्यांनी चामडे (लेदर) उद्योगाला सांगितले.
उद्योजकांना आयात शुल्काची दिली हमी
देशाबाहेर बनवलेल्या विशिष्ट प्रकारच्या चामड्यांवरील आयात शुल्काबाबत उद्योगांच्या सूचनांचा विचार केला जाईल. तसेच महसूल विभागाच्या वेअरहाऊसिंग रेग्युलेशन (MoWR) योजनेचे फायदे पूर्णपणे पाहिजेत, ज्यामुळे उद्योजकांना कोणतीही वस्तू शुल्कमुक्त आयात करता येते, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरी चप्पललाही मार्केटमध्ये मोठी संधी
कोल्हापुरी चप्पल हे भारतातील अद्वितीय उत्पादन आहे ज्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. त्याचा प्रचार व्हायला हवा. कोल्हापुरी चप्पल नवीन आणि सुधारित डिझाईन, आराम आणि पॅकेजिंगसह ब्रँडिंग इकोसिस्टममध्ये समाविष्ट करता आल्यास खूप संधी आहे, असेही पीयूष गोयल म्हणाले. योग्य ब्रँडिंग आणि ई-कॉमर्स जगभरात पुरवठा साखळी तयार करण्यात मदत करू शकतात, असेही ते शेवटी म्हणाले.