Bournvita sugar content: मागील काही दिवसांपासून कॅडबरी कंपनीचे बोर्नविटा प्रॉडक्ट वादात सापडले आहे. लहान मुलांसाठी हेल्थ ड्रिंक म्हणून याचं मार्केटिंग केलं जातं. भारतामध्ये खपही जास्त आहे. मात्र, बोर्नविटामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच कर्करोगाला आमंत्रण देतील अशी घातक केमिकल्स यामध्ये असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसरने बोर्नविटाबद्दल बनवलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता बोर्नविटा सरकारी यंत्रणांच्या निशाण्यावरही आले आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि पॅकेजिंग बंद करा
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने बोर्नविटाची चौकशी सुरू केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि डब्याच्या पॅकेजिंगवरील मजकूर बदलण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी कंपनीला नोटीस पाठवली असून सात दिवसांत उत्तर मागितले आहे. NCPCR ने रिपोर्टचा अभ्यास करण्यासाठी एक कमिटीही स्थापन केली आहे. बोर्नविटा हेल्थ ड्रिंक असून लहान मुलांच्या विकासासाठी फायदेशीर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येतो. 'तैयारी जीत की' अशा टॅगने कंपनीकडून मार्केटिंग केली जाते. मेंदू, हाडांच्या विकासासाठी बोर्नविटा फायदेशीर असल्याचे जाहिरातीतून सांगितले जाते. मात्र, बोर्नविटाचा हा दावा खोटा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
व्हायरल व्हिडिओत काय होते?
रेवंत हिमतसिंग्का (Revant Himatsingka) या इन्स्टाग्राम इन्फ्लूएनसरने बोर्नविटा आरोग्यास अपायकारक असल्याचा दावा व्हिडिओत केला होता. त्याचा फूड फार्मर (Food Pharmer) नामक इन्स्टाग्राम चॅनल आहे. यावर त्याने बोर्नविटा प्रॉडक्टचा रिव्हू व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये रेवंतने दावा केला होता की, बोर्नविटामध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि शरीराला हानीकारक असे केमिकल्स आहेत. कोरोनाच्या आधी बोर्नविटा पॅकेटवर इम्युनिटी बुस्टर असा शब्द नव्हता. मात्र, विक्री वाढवण्यासाठी उत्पादनात कोणताही बदल न करता फक्त इम्युनिटी शब्द पॅकेटवर टाकला. बोर्नविटा पॅकेटमध्ये 50% साखर असल्याचे, त्याने म्हटले होते.
नागरिकांकडून बोर्नविटाविरोधात तक्रार दाखल
हा व्हिडिओ व्हायरल होऊन 1 कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचला होता. परेश रावल, आर. माधवन, किर्ती आझाद यांनीही हा व्हिडिओ लाइक आणि शेअर केला होता. दरम्यान, कॅडबरी कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर रेवंतने कंपनीची माफी मागत व्हिडिओ काढून टाकला होता. मात्र, या संपूर्ण प्रकाराने कंपनीची प्रतिमा मलिन झाली. नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात कंपनीविरोधात तक्रारी दाखल झाल्या. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानेही बोर्नविटामधील कंटेटची माहिती घेत असल्याचे म्हटले आहे.