Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

‘हातमाग’, गौरवशाली भारताचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रतिक!

National Handloom Day 2022

National Handloom Day 2022 : 1905 मध्ये भारतात सुरू झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 7 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ (National Handloom Day) म्हणून पाळला जातो. 2015 मध्ये तत्कालीन सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून घोषित केला.

स्वातंत्र्य पूर्व भारतात भारतीयांना परदेशी बनावटीच्या कपड्यांऐवजी भारतीयांनी हातमागावर तयार केलेले कपडे वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने स्वदेशी चळवळ राबवण्यात आली होती. त्या चळवळीची मुहूर्तमेढ 7 ऑगस्ट, 1905 रोजी रोवण्यात आली होती. त्या दिवसाच्या स्मरणार्थ 2015 मध्ये तत्कालीन सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) म्हणून घोषित केला.

‘हातमाग’चा इतिहास आणि अर्थव्यवस्थेतील त्याचे स्थान!

ज्या यंत्रावर किंवा मशीनवर हाताच्या किंवा पायाच्या सहाय्याने कापड विणले जाते, त्याला ‘माग’ असे म्हटले जात होते. कालांतराने हाताने कापड विणणाऱ्या मशीनची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे तो हातमाग या नावाने प्रचलित झाला. इतिहासात डोकाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, भारतातील ग्रामीण भागात हातमाग हे लोकांच्या उदरनिर्वाहाचं एक प्रमुख साधन होतं. त्याचबरोबर ते आपल्या गौरवशाली सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचं कलात्मक प्रतिक आहे. रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाहता भारतात शेतीनंतर हातमाग हा प्रमुख उद्योग होता. घराघरातून चालविल्या जाणाऱ्या या उद्योगात गुंतलेल्या लोकांची संख्या प्रचंड होती.

इंग्रजांचं आगमन आणि कापड उद्योगाला घरघर

भारतात इंग्रजांचं आगमन होण्यापूर्वी इथून सुती आणि लोकरीचे कपडे, शाल आणि कशिदाकाम केलेल्या कपड्याची निर्यात होत होती. पण भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने इंग्रजांचं आगमन झालं तसं त्यांनी भारतातून जगभरात निर्यात होणाऱ्या कापड उद्योगावर गदा आणली. त्यांनी इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या कापडाची आयात वाढवून भारतातील अनेक वर्षांचा कापड उद्योग रसातळाला आणला. परिणामी भारतात इथे तयार होणाऱ्या कापडाचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी ‘स्वदेशी चळवळ’ राबवावी लागली. या चळवळीचं स्मरण म्हणून राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day 2022)  साजरा केला जातो.

भारतीय हातमाग उद्योगातील काही तथ्ये

  • भारतात शेतीनंतर रोजगार देणारं दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र
  • 4.3 दशलक्षाहून अधिक व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे यात सहभागी
  • देशाच्या एकूण कापड उत्पादनात हातमाग क्षेत्राचा वाटा 15 टक्क्यांहून अधिक
  • जगभरात हाताने विणलेल्या कापडांपैकी एकूण 95 टक्के कापड भारतात आयात
  • आर्थिक वर्ष 2022 मध्ये (जानेवारी 2022 पर्यंत) भारतातून हातमाग उत्पादनांची निर्यात 1,693.05 कोटी रुपये


अनेक स्थित्यंतरं पाहिलेला भारतातला कापड उद्योग आजही आपली वेगळी ओळख टिकवून आहे. कापड उद्योगातील बदलत्या मागणीनुसार आणि ट्रेण्डनुसार भारतातील कापड उद्योगाने कात टाकली आहे.