खंताच्या टंचाई, वाढत्या किमतीमुळे शेती उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीव्यवसाय हा आर्थिक दृष्ट्या तोट्याचा ठरत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबरच नवनवीन संशोधनाच्या जोरावर खत निर्मिती उद्योगामध्येही शेतकरी हितासाठी अनेक उत्पादनांची निर्मिती होत आहे. त्याच प्रमाणे सध्या कृषी क्षेत्रात नॅनो युरियाच्या वापरातून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होत असून उत्पन्नातही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज आपण या नॅनो युरियाचा वापर कसा करायचा आणि त्याचा कशा प्रकारे फायदा होतो याबाबत जाणून घेऊयात.
नॅनो युरियाचा उपयोग काय?
नॅनो युरिया हे द्रव्य स्वरुपात उपलब्ध होणारे खत आहे. हे पिकातील नायट्रोजनची गरज प्रभावीपणे पूर्ण करते, पानांचे प्रकाश संश्लेषण आणि झाडाच्या वाढीस मदत करते. याच्या उच्च कार्यक्षमतेमुळे पारंपारिक म्हणजे दाणेदार युरियाची आवश्यकता 50% किंवा त्याहून अधिक कमी करता येते. नॅनो युरिया पीक उत्पादकता, मातीचे आरोग्य आणि उत्पादनाची पौष्टिक गुणवत्ता सुधारते. त्याच बरोबर पारंपरिक युरियाच्या असंतुलित आणि अतिवापरास देखील आळा बसण्यास मदत होते. परिणामी पीक उत्पादकता वाढते आणि उत्पादन खर्चात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो.
नॅनो युरिया युरियापेक्षा चांगला आहे का?
द्रव नॅनो युरिया 85% पर्यंत कार्यक्षम असतात. याची अधिक परिणामकारकता हे मुख्यतः नॅनोटेक्नॉलॉजीमुळे शक्य झाले आहे. युरियाच्या-वस्तुमान गुणोत्तरांसह अत्यंत लहान कणांची रचना करणे शक्य होते, जे पीक पोषक तत्वांच्या नियमित वितरणास मदत करते. मात्र, दाणेदार युरिया आणि नॅनो युरिया लिक्विड यामध्ये शेतकऱ्यांना हा लिक्विड युरिया हा अधिक प्रभावी ठरत आहे. नॅनो युरियाचा आकार कमी असला तरी त्याची परिणामकारकता जास्त असल्याचे सांगण्यात येते. भारत सरकारने याला चांगले प्रोत्साहित देखील केले आहे.
नॅनो युरियाचा वापर कसा करायचा?
नॅनो युरियाचा वापर कोणत्याही पिकांसाठी करता यतो. तसेच पारंपरिक युरियाप्रमाणे हा जमिनीत न फेकता याची फवारणी करावी लागते. प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 4 मिली नॅनो युरिया वापरण्याची शिफारस केली आहे. ज्या पिकांना नायट्रोजन हे अधिक लागते त्या पिकांसाठी प्रति लिटर 4 मिली असे प्रमाण घ्यावे.
नॅनो युरियाची किंमत-
पारंपारिक युरियाच्या 45 किलोग्रॅमच्या पिशवीची किंमत शेतकर्यांसाठी सुमारे 250 रुपये आहे. त्याच बरोबर इफको कंपनीच्या नॅनो युरियाच्या 500 मिलीच्या बाटलीची किंमत 225 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. म्हणजे एक युरियाची बॅग आणि अर्धा लिटर नॅनो युरियाची एक बाटली दोन्हीचा खर्च जवळपास 20-25 रुपयांच्या फरकामध्ये आहे.
नॅनो युरियाचे यश काय?
नॅनो युरिया खतांमुळे शेतकर्यांना त्यांचे एकूण उत्पादनच नाही तर शेतातील हानिकारक रसायनांचा वापर कमी करण्यास मदत झाली आहे. नॅनो युरिया खताचा सर्वात चांगला भाग म्हणजे त्यामध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात जे वनस्पतीच्या वाढीस मदत करतात. त्यामुळे नॅनो युरियाच्या वापरातून शेती उत्पादन खर्चात बचत होत असल्याचा दावा नॅनो युरिया उत्पादक इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह (इफको) या कंपनीने केला आहे.