आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यवसायांना आणि उपक्रमांना चालना दिली जात आहे. इफको कंपनीच्या नॅनो युरियाच्या यशानंतर आता शेतकऱ्यांना कमी किमतीत नॅनो डीएपी खताची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते दिल्लीतील इफको भवन येथे नॅनो डीएपी खताच्या 500 एमएल लिक्विड बॉटलचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या खताच्या वापरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होईलच, सोबत शेतजमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील मदत होणार आहे.
Table of contents [Show]
निम्म्या किमतीत मिळेल 'नॅनो डीएपी खत'
इफ्को कंपनीने खास शेतकऱ्यांचा विचार करून नॅनो डीएपी खताच्या लिक्विड बॉटलची निर्मिती केली आहे. सध्या बाजारपेठेत पारंपरिक दाणेदार स्वरूपातील डीएपी खत उपलब्ध आहे. शेतकरी आतापर्यंत याच खताचा वापर करत होते. या खताच्या 50 किलो बॅगेची किंमत 1350 रुपये आहे. मात्र इफ्कोने लॉन्च केलेली नॅनो डीएपी 500 एमएल लिक्विड बॉटलची किंमत फक्त 600 रुपये आहे. याचा अर्थ असा की, शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीमध्ये चांगल्या दर्जाचे खत मिळणार आहे.
शेतकऱ्यांना फायदा कसा होईल?
नॅनो डीएपी खताच्या मदतीने शेतकरी मातीची गुणवत्ता सुधारून उत्पन्नात वाढ करू शकतात. या खतात नायट्रोजनचे प्रमाण 8% आहे, तर फॉस्फरसचे प्रमाण 16% आहे. यामुळे पिकाची वाढ चांगल्याप्रकारे होते. शिवाय यामुळे शेतजमिनीतील गांडुळांची संख्या वाढण्यास देखील नॅनो डीएपी खत मदत करते. गांडूळ माती भुसभुशीत करण्यासाठी मदत करतो आणि जमिनीतील कीटक खातो. यामुळे जमिन भुसभुशीत होण्यास मदत होते.
देशातील शेतकरी आजही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक दाणेदार डीएपी खताचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. साधारण कोणत्याही एक एकरातील पिकासाठी सहा ते आठ पोती दाणेदार डीएपी खताचा वापर केला जातो. मात्र याउलट 1 एकर जमिनीसाठी 500 एमएलची नॅनो डीएपी लिक्विडची एक बॉटलच शेतकऱ्यांना पुरेशी असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार आहे.
सबसिडी मिळेल का?
सध्या सरकारकडून पारंपरिक दाणेदार डीएपी खतावर सबसिडी देण्यात येत आहे. मात्र नॅनो डीएपी खतावर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही. थोडक्यात यामुळे सरकारी अनुदानात बचत होणार आहे. 2022-23 मध्ये खत सबसिडीचा खर्च 2.25 लाख कोटी रुपये झाला होता. नॅनो डीएपी खताच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा पिकाच्या उत्पन्नावरील खर्च 6 ते 20 टक्क्यांनी कमी करता येणार आहे.
18 कोटी नॉन डीएपी खत निर्मितीचे लक्ष
इफ्को कंपनीला त्यांच्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खताची निर्मिती करण्यासाठी 20 वर्षांचे पेटंट देण्यात आले आहे. कंपनीला 2025-26 पर्यंत 18 कोटी नॉन डीएपी खताच्या बॉटल्सची निर्मिती करावी लागणार आहे. या खताच्या निर्मितीमुळे 9 दशलक्ष टन पारंपरिक डीएपी खताचा वापर कमी करण्यासाठी मदत होणार आहे. ज्यामुळे वाढते रासायनिक नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.
Source: abplivecom