केंद्र सरकारने कांद्याचे दर (Onion Price) नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊले उचलत कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लागू केले होते. मात्र सरकारच्या या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची चिन्हे होती. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. दरम्यान, केंद्र सरकारकडून आता शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकार नाफेडच्या (Nafed) माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे.
2 लाख टन कांद्याची खरेदी
कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर राज्य सरकारकडून केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे या निर्णयाबाबत दिलासा देण्यासंदर्भात बोलणी करण्यात आली असता. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने राज्यातील तब्बल 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाफेड मार्फत हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध कांदा बाजारपेठामधून ही कांदा खरेदी केली जाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.
प्रति क्विंटल 2410 रुपयांनी खरेदी
नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला केंद्र शासनाकडून क्विटलला 2410 रुपये दर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टळणार आहे. यापूर्वी नाफेडकडून 11 ते 15 रुपये दराने कांदा खरेदी केली जात होती. मात्र, आज राज्याच्या कृषीमंत्र्यांनी केंद्र सरकार 24 रुपयांनी कांदा खरेदी करणार असल्याची माहिती दिली आहे.