2021 च्या तुलनेत 2022 मध्ये म्युच्युअल फंड क्षेत्राची वाढ कमी झाली आहे. मागील वर्षभरात गुंतवणूकीला मिळालेली गती या वर्षात रोडावली आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांकडे यावर्षी तुलनेने कमी रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे नूतन वर्षात या क्षेत्राला उभारी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, जागतिक मंदीची शक्यता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि वाढते व्याजदर यामुळे नागरिकांनी म्युच्युअल फंडामध्ये 2021 च्या तुलनेत कमी गुंतवणूक केली आहे.
MF कंपन्यांकडील एकूण गुंतवणूक (Assets under management- AUM)
फंड कंपन्यांकडे चालू वर्षात म्युच्युअल फंडातील विविध योजनांद्वारे 2.65 लाख कोटी रुपये जमा झाले. या वर्षात 7% वाढ झाली. मात्र, ही आकडेवारी 2021 वर्षाच्या तुलनेत निराशाजनक आहे. 2021 साली म्युच्युअल फंड क्षेत्र 22 टक्के दराने वाढले होते. तर फंड कंपन्यांकडे वर्षभरात 7 लाख कोटींचा फंड जमा झाला होता. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने (AMFI) याबाबतची माहिती सादर केली आहे.
नूतन वर्षात 16 ते 17 टक्क्यांनी वाढ
नवखे गुंतवणूकदार आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामुळे नव्या वर्षात गुंतवणूकीत आणखी वाढ होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. नूतन वर्षात म्युच्युअल फंड क्षेत्राचा विकास 16 ते 17 टक्के दराने होणार असल्याचा विश्वास AMFI चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश यांनी व्यक्त केला आहे. भारताचा विकास आणि पुढील अर्थसंकल्पातून मिळणाऱ्या सहाय्यामुळे या क्षेत्राची वाढ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकीच्या फायद्यांबाबत पुढील वर्षात अधिक जनजागृती होईल. तसेच अनेक नवीन गुंतवणूकदारही पदार्पण करतील. ज्यांनी याआधीच गुंतवणूक केली आहे, ते आणखी पैसे बाजारात आणतील, असे मॉर्निंगस्टार इनवेस्टमेंट कंपनीचे संचालक कौस्तुभ बेलपूरकर यांनी म्हटले आहे.
2020 मध्ये 30 लाख कोटी गुंतवणूक
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या (2022) नोव्हेंबरपर्यंत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक उच्चांकी पातळीला पोहचली होती. एकूण रक्कम 40.37 लाख कोटी झाली होती. ही रक्कम डिसेंबर 2021 ला 37.72 लाख कोटी इतकी होती तर डिसेंबर 2020 ला 31 लाख कोटी होती. या आकडेवारीवरुन असे दिसते की, गुंतवणूकीबाबत नागरिकांमध्ये जगजागृती होत असून मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक केली जात आहे. येत्या काळात ही आकडेवारी अधिक जास्त असेल अशी अपेक्षा आहे. चालू वर्षात तरुण आणि Gen-Z ने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बाजारात अस्थिरता असतानाही महागाईवर मात मिळवण्यासाठी तरुणांकडून म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीला प्राधान्य देण्यात येत आहे. इक्विटी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून पैसे गुंतवण्यात येत आहेत.