म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची म्हटल्यावर, गुंतवणुकदारांना फंडावर आकारल्या जाणाऱ्या चार्जेसची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. कारण, म्युच्युअल फंडात जेव्हा नवीन गुंतवणुकादार गुंतवणूक करतात. तेव्हापासून त्यांना चार्जेस द्यावे लागतात. त्यामुळे ते कोणत्या प्रकारचे चार्जेस असतात. हे माहिती असल्यास, गुंतवणुकदार त्यानुसार सतर्क राहून फंडात गुंतवणूक करु शकतो.
Table of contents [Show]
एंट्री लोड (Entry Load)
जेव्हा गुंतवणुकदार पहिल्यांदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो तेव्हा त्याच्यावर आकारल्या जाणाऱ्या फीला एंट्री लोड म्हणतात. या फीमध्ये म्युच्युअल फंड योजनेला प्रमोट करण्यासाठी अॅसेट मॅनजमेंट कंपनीने उचललेल्या वितरणाच्या खर्चाचा समावेश असतो. तसेच, 2009 पूर्वी फंड हाउसनुसार एंट्री लोडसाठी वेगवेगळ्या फीला सामोर जावे लागत होते. मात्र, सेबीच्या सध्याच्या नियमांनुसार फंड हाउसेस गुंतवणुकदारांकडून एंट्री लोड घेऊ शकत नाहीत.
एक्झिट लोड (Exit Load)
जेव्हा गुंतवणुकदार एखाद्या फंडात रक्कम गुंतवतो. तेव्हा त्याला त्या तारखेपासून एका ठरावीक अवधीपर्यंत बाहेर जाता येत नाही. म्हणजेच पैसे काढता येत नाहीत. तो जर त्या अवधीच्या आत बाहेर पडला तर त्याला एक्झिट लोड द्यावा लागतो. यामुळे बरेच गुंतवणुकदार सहसा फंड खरेदी केल्यावर एक्झिट लोडचा अवधी संपेपर्यत पैसे काढत नाहीत. याचा अवधी एक वर्षाचा असतो. तुम्ही त्याआधी पैसे काढल्यास 1 टक्का एक्झिट लोड द्यावा लागतो. तेच एक वर्ष झाल्यावर तुम्हाला एक्झिट लोड द्यायची गरज पडत नाही.
व्यवहार चार्जेस (Transaction Charges)
जेव्हा गुंतवणुकदार गुंतवणूक करतो, तेव्हा एकदाच त्याच्यावर हा चार्ज लावला जातो. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या गुंतवणुकीसाठी 100 ते 150 रुपये व्यवहार चार्ज द्यावा लागू शकतो. तसेच, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या SIP गुंतवणुकीवरही हे चार्जेस आकारले जाते. तर 10,000 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या SIP वर व्यवहार चार्जेस द्यायची गरज पडत नाही.
एक्सपेन्स रेशो (Expense Ratio)
हा सर्व गुंतवणुकदारांसाठी एक सारखाच असतो. एक्सपेन्स रेशो वार्षिक चार्ज आहे. जो म्युच्युअल फंड योजनेच्या मॅनेजमेंटसाठी अॅसट मॅनेजमेंट कंपनीकडून आकारला जातो. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनेचे मॅनेजमेंट आणि तो फंड चालवण्याचा खर्च यातून काढला जातो. यामध्ये सेल्स आणि मार्केटिंगचा खर्च, प्रशासन शुल्क, वितरण शुल्क आणि फंड मॅनेजरची फी यांचा समावेश असतो.
यासाठी तुम्ही जेव्हाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कराल तेव्हा या गोष्टी पाहून आणि समजूनच गुंतवणूक करा. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे.