तुम्ही ज्या म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करतात त्याची कामगिरी शेअर बाजारावर अवलंबून असते. त्यामुळे बऱ्याचदा म्युच्युअल फंडातून नेमकं कधी बाहेर पडावे हा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावतो. म्युच्युअल फंडांतून बाहेर पडण्यासाठी एक महत्वाचा निकष म्हणजे गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा मिळत असल्यास त्यातून बाहेर पडणे हिताचे ठरते.
म्युच्युअल फंड रिडम्प्शन म्हणजे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांचे युनिट विक्री करण्याचा निर्णय घेतो. यात जर तो किमान गुंतवणूक कालावधीपूर्वी युनिट्सची विक्री करत असेल तर म्युच्युअल फंड कंपनी त्यावर एक्झिट लोड आकारते. म्युच्युअल फंडांची विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नावर गुंतवणूकदाराला भांडवली नफा कर लागू होतो. हा कर म्युच्युअल फंड योजनेचा प्रकार आणि गुंतवणूक कालावधी यावर अवलंबून असतो. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करुन मगच म्युच्युअल फंड रिडीम करण्याचा निर्णय घ्यायला हवा.
कोणत्या वेळी फंडातून पैसे काढून घ्यावे किंवा युनिट्सची विक्री करावी हे तुम्ही जेव्हा गुंतवणुकीचा निर्णय घेतात त्या परिस्थितीवर अवलंबून असते. काहीजण अल्प मुदतीच्या उद्देशाने गुंतवणूक करतात. काहीजण पर्यटनाला बाहेर जाण्यासाठी बचत करता यावी म्हणून गुंतवणूक करतात. काहीजण दिर्घ उद्देशाने जसे की मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्नकार्य यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने उद्देश साध्य झाल्यास गुंतवणूक काढता येऊ शकते.
गुंतवणूक काढून घेण्यापूर्वी त्यावर लागणारे शुल्क आणि कर याचाही विचार करायला हवा. म्युच्युअल फंडाची कामगिरी देखील तितकीच महत्वाची आहे. एखादी योजनेची कामगिरी खालावली असेल तर फारकाळ वाट न पाहता त्यातून बाहेर पडल्यास मोठ नुकसान टाळता येऊ शकते. पोर्टफोलिओचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.