गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या साधनांमधील म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Mutual Fund & Public Provident Fund)ही दोन्ही दीर्घकालीन गुंतवणुकीची साधने आहेत. यामध्ये फरक इतकाच आहे की, म्युच्युअल फंड ही शेअर मार्केटशी जोडलेली गुंतवणूक असून, ती जोखीमची गुंतवणूक मानली जाते. तर पीपीएफ ही जोखीममुक्त गुंतवणूक आहे. यानुसार ज्या गुंतवणूकदारांची जोखमीची क्षमता जास्त आहे. त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) योग्य ठरू शकतो आणि ज्यांची जोखमीची क्षमता कमी आहे; त्यांच्यासाठी पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund-PPF) ही योग्य गुंतवणूक ठरू शकते.
म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंड हे गुंतवणुकीचे दोन वेगवेगळे प्रकार आणि माध्यमं आहेत. एखादा गुंतवणूकदार त्याचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवण्यासाठी या दोन्ही योजनांचा समावेश करू शकतो. फक्त यामध्ये गुंतवणूक किती करावी. हे गुंतवणूकदाराने त्याच्या जोखमीच्या आणि पोर्टफोलिओतील गुंतवणुकीनुसार ठरवावे. म्युच्युअल फंडमध्ये जोखीम जास्त आहे. पण त्यातून मिळणारा परतावा हा सुद्धा तसाच असू शकतो. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांची जोखीम क्षमता जास्त असली तरी ते नियमित आणि सुरक्षित परतावा मिळवण्यासाठी पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात.
दीर्घ मुदतीसाठी कोणती योजना योग्य?
दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर, आर्थिक सल्लागार प्रामुख्याने म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे, असे सांगतात. कारण म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्यावर किमान 12 ते 13 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. त्या तुलनेत पीपीएफ (Public Provident Fund-PPF)वर सरकार फक्त वार्षिक 7.1 टक्के व्याज देते. त्यामुळे संपत्तीत वाढ करायची असेल तर म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक योग्य ठरू शकते. पण म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही मार्केटमधील जोखमीच्या अधीन असते.
'पीपीएफ'चा व्याजदर 7.1 टक्के
सरकार पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याजदर देते. या व्याजाची गणना प्रत्येक महिन्याच्या 5व्या दिवशी आणि महिन्यातील शेवटी केली जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी या योजनेतून जमा होणारे व्याज खातेदाराच्या खात्यात जमा केले जाते. पीपीएफमध्ये कमीतकमी 500 रुपये आणि अधिकाधिक 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. तसेच याचा कालावधी 15 वर्षे इतका आहे. म्हणजे गुंतवणूकदाराला यात 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. पीपीएफमधील गुंतवणूक ही इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. यामध्ये गुंतवणुकीची लवचिकता, वैविध्यपूर्ण गुंतवणूक, कमीतकमी किमतीत गुंतवणूक करण्याची संधी, लॉक-इन पिरिअडचा कालावधी नाही, ईएलएसएस सारख्या फंडमधून टॅक्स सेव्हिंगचा फायदा घेता येतो. तसेच गुंतवणूक केलेल्या फंडमधील पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी प्रत्येक फंडला प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो.