Mutual Fund AUM reduced: म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, मागील दोन महिन्यांपासून म्युच्युअल फंडामध्ये होणारी गुंतवणूक रोडावली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी ते अदानी समुहावरील हिंडनबर्ग रिसर्च पेपर अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. सोबत मागील काही महिन्यांपासून माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केली जात आहे. अमेरिका, युके आणि चीनची अर्थव्यवस्थाही रेंगाळली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता (Instability in International market)
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत मोतीलाल ओसवाल फर्मने अहवाल जारी केला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडातील अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 39.6 लाख कोटी इतकी होती. मात्र, बाजारातील अस्थिरतेमुळे विदेशी गुंतवणुकदारांनी बाजारातून पैसे काढून घेतले. अदानी ग्रुपचे ढासळलेले बाजारमूल्य, व्याजदरात वाढ, कॉरपोरेट्सचे तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्न आणि बजेटकडून नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा याचा परिणाम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर झाला.
परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढली (FII withdrew investment from India)
जानेवारीमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 29,950 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडामधून काढून घेतली. मागील वर्षी डिसेंबरमहिन्यात एसआयपीद्वारे 13,573 कोटी रुपये जमा झाले होते. तर जानेवारी महिन्यात यात मोठी वाढ झाली नाही. Nifty50 निर्देशांकात 2.4% घट होऊन 17,662 वर स्थिरावला. सलग दुसऱ्या महिन्यात MF मधील गुंतवणूक कमी झाली. जानेवारी 2023 मध्ये देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक 4.1 बिलियन डॉलर इतकी होती. तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3.7 बिलियन डॉलरची गुंतवणूक काढून घेतली.
इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (ELSS आणि index funds मधील गुंतवणुकीसह) 16.5 लाख कोटी इतकी होती. यामध्ये मागील म्हणजेच डिसेंबर 2022 च्या तुलनेत 0.9% घट झाली.
कोणत्या क्षेत्रांना डिमांड? (Which sector has demand for MF investment)
जानेवारी महिन्यात विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचा ट्रेंड बदलताना दिसला. टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाइल, भांडवली वस्तू, कन्झ्युमर गुड्स, धातू, विमा, दररोजच्या वापरातील वस्तू या क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये विविध फंड्सकडून गुंतवणूक वाढली. तर खासगी आणि सरकारी बँका, सिमेंट, रिटेल, केमिकल्स, पायाभूत क्षेत्रातील कंपन्या, कापड उद्योगातील कंपन्यांमधील गुंतवणूक मध्यम स्वरुपाची राहिली. परदेशी गुंतवणूकदारांनी जरी पाठ फिरवली असली तर देशी संस्थात्मक गुंतवणूकदार बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा लावत आहेत.
काही प्रमुख म्युच्युअल फंडांची इक्विटी मूल्य कमी झाले. अॅक्सिस म्युच्युअल फंड (-5.4%), आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड (-2.9%), युटीआय Mutual Fund (-2.2%), डीएसपी Mutual Fund (-2.0%) आणि Mirae Asset Mutual Fund (-1.8%) या फंडांचे इक्विटी मूल्य घसरले.