जगातल्या पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये ज्यांचा समावेश आहे, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता एक वेगळाच निर्णय घेतला आहे. वेगळा यासाठी की एखाद्या उद्योगसमुहासोबत भागीदारी करणं, आर्थिक व्यवहार करणं हा उद्योगांचं कामच आहे. मात्र भारतात काही काळापूर्वी जे चायनीज अॅप बॅन (Chinese apps banned) करण्यात आलं होतं, त्या कंपनीलाच अंबानी पुन्हा भारतात आणणार असल्याचं समजतंय. बीक्यू प्राइमनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय. मुकेश अंबानी त्यांच्या रिटेल (Retail) सेगमेंटची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. याच रिलायन्स रिटेलची नजर आता चीनच्या टॉप फॅशन चेनवर असल्याचं दिसतं. मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल ही चीनची फॅशन दिग्गज असलेल्या 'शीन'ला (Shein) भारतात आणण्याच्या तयारीत आहे.
Table of contents [Show]
धोरणात्मक भागीदारीच्या अंतर्गत आणणार भारतात
चीनच्या विविध अॅप्सना भारतात बंदी घालण्यात आली. त्यामध्ये शीनचादेखील समावेश आहे. शीन ही एक चायनीज रिटेल फॅशन चेन आहे. चीनच्या अॅप्सना भारतात बंदी घातल्यानंतर त्यांचे भारतातले व्यवहार थांबले. शीनदेखील आपल्या अॅपच्या माध्यमातून वस्तू भारतात विकू शकत नव्हती. मात्र रिलायन्स रिटेल या चिनी फॅशन रिटेलला धोरणात्मक भागीदारीच्या अंतर्गत भारतात परत आणू शकतं.
Almost three years after getting banned in India, Chinese online fast fashion brand #Shein is re-entering India in partnership with #RelianceRetail. https://t.co/wcQkiSKlWP
— BQ Prime (@bqprime) May 18, 2023
फॅशन सेगमेंटची घोडदौड
शीन ही फॅशन साखळी चीनमध्ये स्वस्त आणि ट्रेंडी कपड्यांसाठी ओळखली जाते. भारतातही शीननं आपला व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली होती. मात्र चायनीज अॅप्सवर बंदी आणल्यानंतर शीनला आपला व्यवसाय करताना मर्यादा आल्या आणि माघार घ्यावी लागली. मात्र आता रिलायन्सनं शीनचा पोर्टफोलिओमध्ये समावेश केला तर रिलायन्स रिटेल नेमकं कोणत्या रणनीतीनुसार त्याचा भारतात विस्तार करणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुकेश अंबानींची रिटेल सेगमेंटमधली प्रगतीही वेगानं होताना दिसतेय. रिलायन्स रिटेल सध्या फॅशन क्लोथिंग सेगमेंटमध्ये रिलायन्स ट्रेन्ड्सच्या माध्यमातून कपडे विकते.
चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा
भारतात ज्याप्रमाणं रिलायन्स रिटेलची क्रेझ आहे, त्याचप्रमाणं चीनमध्येही शीनचं मोठं प्रस्थ आहे. वॉल स्ट्रीटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शीननं 2 बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत सुमारे 16,000 कोटी निधी उभारला होता. मागच्या वर्षी कंपनीचं मूल्य अंदाजे 100 अब्ज डॉलर इतकं होतं. या आकड्यात आणखी वाढ होऊ शकते. रिलायन्ससोबत भागीदारी झाल्यास शीनला चांगला फायदा होऊ शकतो. कारण भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. फॅशन विभागामध्ये भारतातून चांगला प्रतिसाद याला मिळण्याची अपेक्षा आहे.
जोडली गेली मोठी नावं
आता या ब्रँडची रिलायन्ससोबत भागीदारी झाल्यास रिलायन्सच्या मोठ्या ब्रँडचा फायदा चिनी कंपनीलाही मिळेल. खरं तर, रिलायन्सच्या स्वस्त आणि लक्झरी फॅशन ब्रँडशी आधीही मोठी नावं जोडलेली आहेत. यामध्ये जॉर्जियो अरमानी, गॅस, ह्यूगो बॉस, अरमानी एक्स्चेंज, जिमी चू यांसह विविध नावांचा समावेश आहे. तर दुसरीकडे ड्रेस डिझायनर्सचा विचार केला तर, मनीष मल्होत्रा, अबू जानी, संदीप खोसला, सत्य पॉल यांसारखी मोठी नावंही त्यात समाविष्ट आहेत.