Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC@75Years: विना तिकीट एसटीतून प्रवास केल्यावर किती दंड आकाराला जातो? जाणून घ्या

MSRTC Without Ticket Penalty

Image Source : www.alamy.com

MSRTC@75Years: जर तुम्हीही दैनंदिन एसटीने प्रवास करत असाल, तर विना तिकीट प्रवास कधीही करू नका. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाने फरारी पथक तयार केले आहे. हे पथक चालत्या एसटीला थांबवून तिकीट तपासणी करू शकते. जर प्रवाशाकडे तिकीट नसेल, तर त्याला दंड भरावा लागतो. हा दंड नेमका किती असतो? जाणून घेऊयात.

गावखेड्यात पोहोचलेली एकमेव ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे 'एसटी महामंडळ'. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत ती सगळ्यांना सामावून घेते. म्हणूनच तर गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी हे समीकरण वर्षानुवर्षे आपल्या परिचयाचे आहे. याच एसटीने महाराष्ट्रातील लाखो लोक दररोज प्रवास करतात. लोकांना परवडणाऱ्या दरात आणि वेगवेगळ्या सवलतींसह एसटीमधून प्रवास करता येतो. एसटीमधील काही सीट्स या स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लोक आणि सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

लोकांनी जास्तीत जास्त एसटीने प्रवास करावा म्हणून परिवहन विभागाकडून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना दैनंदिन प्रवासासाठी पासची सोय उपलब्ध करून दिली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांना एसटीमधील तिकिटात 50 % सवलत दिली आहे. यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशाच वाढत्या गर्दीमध्ये अनेकजण एसटीमधून विना तिकीट प्रवास (Without Ticket Travel) करतात. असा प्रवास केल्यावर नक्की काय शिक्षा होते, किती दंड होतो, ते जाणून घेऊयात.

तिकीट तपासणीसाठी विशेष फरारी पथक 

एसटी ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येते. मुळात सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात प्रवास करता यावा यासाठी एसटीकडून कमीत कमी किंमतीत तिकीट उपलब्ध करून दिले जाते. मात्र अनेकजण विना तिकीट एसटीचा प्रवास करतात. अशा फुकट्या लोकांना पकडण्यासाठी परिवहन विभागाकडून एक फरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे फरारी पथक अचानक चालत्या एसटीमधील प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी करू शकते. यामधील तिकीट इन्स्पेक्टर (Ticket Inspector) अधिकाऱ्याने प्रवाशाकडे तिकीट दाखवण्याची विनंती केली, तर प्रवाशाला ते दाखवणे बंधनकारक आहे.

विना तिकीट प्रवास केल्यावर होतो 'इतका' दंड

जर प्रवाशाने एसटीचे तिकीट काढले नसेल आणि तो तिकीट इन्स्पेक्टरला सापडला, तर त्याला किती दंड भरावा लागतो, याबाबत महामनीने मुंबई विभागाचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले (Abhijit Bhosle, Public Relations Officer of ST Corporation, Mumbai Division) यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रवाशाचा प्रवास जिथून सुरु झाला आहे किंवा एसटीचा प्रवास जिथून सुरु झाला आहे, त्या ठिकाणापासून ते प्रवाशाला जिथे उतरायचे आहे, त्या ठिकाणापर्यंतच्या तिकिटाचा दहा पट दर किंवा 100 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती दंड स्वरूपात प्रवाशाला भरावी लागते. 
उदा. एखादा व्यक्ती विना तिकीट प्रवास करताना सापडला, तर त्याला 100 रुपये दंड किंवा तिकिटाचा दर जर 20 रुपये असेल, तर त्याच्या 10 पट रकमेचा दंड भरावा लागतो.

प्रवाशाने हा दंड भरण्यास नकार दिला, तर त्याच्यावर शासकीय कारवाई करण्याचा अधिकार तिकीट इन्स्पेक्टरला देण्यात आला आहे. त्यामुळे एसटीमधून प्रवास करण्यापूर्वी तिकीट काढणे गरजेचे आहे. जर विना तिकीट प्रवास केला, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

75-yrs-logo-st-06-1.png