बिग बी अमिताभ बच्चन यांनी अंधेरी पश्चिम मुंबई येथे एकूण 28.7 कोटी रुपयांना चार ऑफिसेसची खरेदी केली आहे. त्यांच्या एका ऑफिसचा आकार 2099 चौरस फुट आहे. वीर देसाई रोडवरील वीर सावरकर प्रोजेक्टच्या 'सिग्नेचर' बिल्डिंगमध्ये बिग बींनी या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या मालमत्तेसाठी अमिताभ बच्चन यांनी 1. 72 कोटी रुपये इतकी स्टॅम्प ड्युटी भरली आहे. या मालमत्तेची 1 सप्टेंबरला नोंदणी करण्यात आली आहे.
या स्टार्सनी घेतले ऑफिस
सिग्नेचर बिल्डिंगमध्ये बच्चन यांच्याबरोबर अनेक बाॅलीवूड स्टार्सनी मालमत्ता खरेदी केल्याचे समजते. यामध्ये बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन यानेही याच इमारतीत ऑफिसची मालमत्ता खरेदी केली आहे. त्याने 10.9 कोटी रुपयांची 2099 चौरस फूट आकाराची मालमत्ता खरेदी केली आहे. तसेच, या जागेसाठी त्याने 47.55 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. 4 सप्टेंबरला या मालमत्तेची नोंदणी करण्यात आली आहे.
तसेच, जुलैमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंग यांनीही याच इमारतीत 2099 चौरस फूट आकाराची मालमत्ता 9 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली. याचबरोबर 'सिग्नेचर' बिल्डिंगमध्ये अलीकडेच अजय देवगणने 45.9 कोटी रुपयांना पाच ऑफिस खरेदी केले आहेत. त्याची मालमत्ता ही 13,293 चौरस फूट इतकी आहे. तर त्याची पत्नी काजोल हिने देखील या इमारतीमध्ये दुसरे ऑफिस सात कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
Source : Financial Express