प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची स्त्री, म्हणजे आई. तिच्या आर्थिक सवयींचा आपल्यावर प्रभाव असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण हे इतर सवयींइतकंच स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. या जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी तिने शिकवल्या आहेत. विशेषत: नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या आईकडून मुले पैशांच्या व्यवहाराबाबत अनेक चांगल्या गोष्टी शिकत असतात. ‘मदर्स डे’निमित्त असेच काही आर्थिक फंडे इथे देत आहोत.
पैशाची किंमत
या जगात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी पैसा लागतो आणि पैसे मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत व धडपड करावी लागते. याचे धडे आई प्रत्येकवेळी मुलाला देत असते. एखादं खेळणं विकत घेण्यासाठी किती पैसे लागतात आणि तेवढेच पैसे मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते, हे सांगत असते. पैशांचं मूल्य काय? ते कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत याचं शिक्षण घरातून मिळत असतं.
पैसे साठवणे
कुटुंबातील कमावत्या व्यक्तीकडून कितीही पगार आला तरी त्यातील किमान रक्कम बाजुला काढून उर्वरित पैशांमध्ये घरखर्च भागवणे, ही प्रत्येक कुटुंबातील आईची खासियत असते. घरात पैसे जास्त किंवा कमी येतात, यापेक्षा आलेल्या पैशातील एक भाग बचत म्हणून बाजुला काढून ठेवायचा.
पैसे साठवण्याच्या वेगवेगळ्या जागा
बऱ्याचवेळा घरातील स्त्री वेगवेगळ्या डब्यांमध्ये, कपाटामध्ये, कपड्यांमध्ये काही वेळेस धान्यामध्ये पैसे साठवून ठेवते. असे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवल्याने त्याचे दडपण राहत नाही. पैसे साठवण्यामध्ये सहजता येते आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वेळच्या अडचणीनुसार त्याचा कमी-जास्त प्रमाणात वापर करता येतो.
कामाचा मोबदला
आई लहानपणापासून मुलांना घरातील कामं करण्याची नकळत सवय लावत असते. या कामातून मुलांना परिश्रमाचं मोल कळतं आणि त्यातून मिळणारा मोबदला त्याचं मूल्य वाढवतं. हा मोबदला कमी असला तरी त्यातून मिळणारे शिक्षण हे आयुष्यभरासाठी पुरणारे असते. हे सर्व करत असताना मुलांमध्ये आर्थिक व्यवस्थापनाची चांगली सवय अंगी बाळगते आणि त्यातून मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
पिगी बॅंक आणि बचतीची सवय
पैशाचं मूल्य आईकडून लहानपणापासूनच शिकवलं जातं. याचं उदाहरण म्हणजे, पिगी बॅंक. एखादी वस्तू हवी असेल तर त्यासाठी पैसे साठवावे लागतात. पुरेसे पैसे साठले की, त्यातून आपल्याला हवी असलेली वस्तू खरेदी करता येते. पिगी बॅंकेच्या सवयीतून बचतीची चांगली सवय लागते. तसेच साठवलेल्या पैशाचा खर्च कशासाठी करायचा आहे, याची स्पष्टता असते.
तोंडपाठ हिशोब
घरखर्च भागवताना प्रत्येक गोष्टीसाठी किती पैसे खर्च करावे लागतात. वस्तुंच्या किमती वाढल्यावर त्याचा परिणाम घरखर्चावर कसा होऊ शकतो. याचा हिशोब तोंडपाठ असल्याने त्यात सहसा चूक होत नाही. महिन्याचे पेपरचे बिल, दुधाचा हिशोब, भाजीसाठी होणारा खर्च, मुलांचे वाढदिवस, पिकनिक, कौटुंबिक सोहळे अशा सर्व गोष्टींवर होणाऱ्या खर्चाचा हिशोब तोंडपाठ असल्याने महिन्याचे आर्थिक गणित व्यवस्थित पार पडायचे.
खरेदीपूर्वी वस्तूची योग्य किंमत जाणून घेणे
कोणतीही गोष्ट विकत घेताना तिचे इतर दुकांनांमध्ये मूल्य काय आहे. प्रत्येक ठिकाणी त्याची किंमत थोड्याफार फरकाने समानच आहे का? अशा सर्व बाजुंनी विचार करून मगच त्याची खरेदी करावी.
आपत्कालीन निधी
आर्थिक संकट कधीही आणि कोणावरही येऊ शकतं. अशा संकटाला तोंड देण्यासाठी आई नेहमी तत्पर असते. कारण ती त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे साठवून ठेवत असते. अशाप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेल्या पैशातून आलेले आर्थिक संकट परतवताना आर्थिक ताण येत नाही.
अशाप्रकारे आई, वर्षानुवर्षे घराचा आर्थिक व्यवहार लिलया पार पाडत आहे आणि तिच शिकवण मुलांना देत आहे. या सवयी टिपिकल किंवा बाळबोध वाटू शकतात. पण अनेक अर्थतज्ज्ञांनी या सवयींना आर्थिक शिस्त म्हटले आहे. जगप्रसिद्ध वॉरेन बफेट याने अशाच लहानमोठ्या आर्थिक सवयींतून अफाट अशी संपत्ती निर्माण केली आहे. आपणही ‘मदर्स डे’च्या निमित्ताने या आर्थिक सवयी अंगी बाळगू आणि स्वत:ची आर्थिक प्रगती करू.