Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Expensive Number Plate: काय म्हणता! गाडीच्या नंबर प्लेटसाठी मोजले तब्बल 123 कोटी!

Expensive Number Plate

VIP वाहन नंबर प्लेटचा हा लिलाव थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाला आहे. लिलावातून मिळवलेले हे पैसे सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी वापरले जाणार आहेत असं आयोजकांनी जाहीर केलं आहे. दुबईचे सुलतान मुहम्मद बिन रशीद अल मकतुम (Mohammad bin Rashid Al Maktoum) यांनी या लिलावाचे आयोजन केले होते.

वाहन खरेदी करणे ही अनेकांची हौस असते.आपल्या आवडीची महागडी गाडी खरेदी करावं असं देखील अनेकांचं स्वप्न असतं. सोबतच वाहन खरेदी केल्यानंतर   आपल्या आवडीच्या नोंदणी क्रमांक मिळावा अशी देखील काही लोकांची इच्छा असते. त्यासाठी वाट्टेल तितके पैसे खर्च करण्याची देखील अनेकांची तयारी असते. हौसेला मोल नाही असं आपल्याकडे उगाचंच म्हटलं जातं नाही. दुबईत राहणाऱ्या अशाच एका हौशी माणसानं एका नंबर प्लेटसाठी थोडेथोडके नाही तर तब्बल 123 कोटी रुपये खर्च केले आहेत. काय म्हणता यावर विश्वास बसत नाहीये ना? पण हे अगदी खरं आहे.

दुबईमध्ये पार पडलेल्या एका लिलावात P7 या वाहन क्रमांकासाठी एका व्यक्तीने 5 कोटी दिरहम मोजले आहेत. दिरहम हे दुबईचे चलन असून, 1 दिरहमची किंमत भारतीय चलनात जवळपास 23 रुपये इतकी आहे. म्हणजेच 5 कोटी दिरहमची किंमत जवळपास 123 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे.

दुबईतील झुमेरा शहरातील एका हॉटेलमध्ये व्हीआयपी फोन नंबर आणि वाहन नंबर प्लेटसाठी एका खास लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. यात दुबईतील अनेक उद्योगपतींनी हजेरी लावली होती. या लिलावात व्हीआयपी मोबाईल नंबर देखील करोडो रुपयांत विकले गेले आहेत.

काय होणार या पैशाचं? 

VIP वाहन नंबर प्लेटचा हा लिलाव थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाला आहे. लिलावातून मिळवलेले हे पैसे सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी वापरले जाणार आहेत असं आयोजकांनी जाहीर केलं आहे.मुस्लिम समुदायात रमझान महिन्यात गरजू आणि होतकरुंना आर्थिक मदत करण्याची एक प्रथा आहे. लिलावातून मिळालेल्या 123 कोटी रुपयांचा वापर भुकेल्यांना जेवण देण्यासाठी केला जाणार आहे.

वन बिलियन मिल्स अभियानात सहभाग

One Billion Meals हे जागतिक स्तरावर चालवली जाणारे अभियान आहे. या अभियानात जगभरातील वंचित, गरीब समूहांना जेवण पुरवले जाते. 5 कोटी दिरहमची बोली लावणाऱ्या व्यक्तीने मात्र स्वतःचे नाव माध्यमांमध्ये येऊ नये अशी विनंती आयोजकांकडे केली होती. त्यामुळे सदर व्यक्तीचे नाव जाहीर केले गेलेले नाही.

या लिलावातून सुमारे 10 कोटी दिरहम म्हणजेच तब्बल 223 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला आहे. दुबईचे सुलतान मुहम्मद बिन रशीद अल मकतुम (Mohammad bin Rashid Al Maktoum) यांनी या लिलावाचे आयोजन केले होते.

भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट

CarToq या वेबसाईटनुसार मुंबईस्थित उद्योजक आशिक पटेल यांनी टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही गाडीच्या नंबर प्लेटसाठी 34 लाख रुपये खर्च केले आहे. जेम्स बॉंडचे चाहते असलेल्या आशिक यांना गाडीसाठी '007' हा नोंदणी क्रमांक हवा होता. 30 लाखांच्या गाडीसाठी आशिक पटेल यांनी 34 लाख रुपये खर्च केले होते. नंबर प्लेटसाठी भारतातील आतापर्यंतची ही सर्वात महागडी डील होती असं म्हटलं जातंय.

Source: https://rb.gy/ee4we