Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Can Climb 80000 by Dec 2023: पुढील वर्षभर शेअर मार्केटमध्ये तेजीचा बोलबाला,सेन्सेक्स-निफ्टी शिखर गाठणार

Sensex-Nifty Prediction 2023

Sensex Prediction: जागतिक पातळीवर सर्वत्र मंदीचा प्रभाव वाढत असला तरी भारतात मात्र तेजीचे वातावरण आहे. खासकरुन शेअर मार्केटमधील सेन्सेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड पातळीवर ट्रेड करत आहे. ही तेजी पुढील वर्षात कायम राहणार असून डिसेंबर 2023 अखेर सेन्सेक्स 80000 अंकांचा टप्पा गाठेल, असा अंदाज एका मोठ्या ब्रोकरेज कंपनीने व्यक्त केला आहे.

कोरोना संकटातून झपाट्याने सावरलेली अर्थव्यवस्था,परदेशी गुंतवणुकीचा सातत्यपूर्ण ओघ यामुळे सध्या भारतीय शेअर निर्देशांक ऐतिहासिक पातळीवर आहेत. सेन्सेक्सने 63000 अंकांचा टप्पा ओलांडला असून निफ्टी 18700 वर गेला आहे.शेअर मार्केटमधील तेजीचा बोलबाला पुढील वर्षभर सुरु राहणार असल्याचे डिसेंबर 2023 अखेर सेन्सेक्स 80000 अंकांपर्यंत जाईल, असा अश्वासक अंदाज मॉर्गन स्टॅन्ले या ब्रोकरेज कंपनीने व्यक्त केला आहे. मात्र यासाठी काही क्षेत्रांत सुधारणा आणि धडाकेबाज निर्णय सरकारने घेण्याची आवश्यकता ब्रोकरेज कंपनीने व्यक्त केली आहे. (Morgan Stanley Predicts Sensex Can Climb 80000 by Dec 2023)

ग्लोबल बॉंड निर्देशांकात समावेश झाल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होण्याची शक्यता मॉर्गन स्टॅन्लेने व्यक्त केला आहे. यामुळे पुढील वर्षभरात भारतात 20 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र टॅक्स संबधीचे संभ्रम दूर करणे आणि बॉंड सेटलमेंटसंदर्भातील नियमावलीत सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता आहे, असे सूचवण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष 2022-25 या काळात इंधन, खते यांच्या किंमतीत घसरण झाल्यास आणि कॉर्पोरेट कंपन्यांची महसूल वृद्धी 25% ने झाली तर त्याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटतील. सेन्सेक्स 80000 अंकांपर्यंत वाढेल, असे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे.त्यापूर्वी मॉर्गन स्टॅन्लेने सेन्सेक्सचे अल्प कालावधीतील टार्गेट 68500 इतके ठेवले आहे.यासाठी रशिया-युक्रेन युद्धाचा 2023 पूर्वीच समेट झाला होणे आवश्यक आहे. ज्यामुळे प्रमुख कमॉडिटीच्या किंमती कमी होतील.त्याशिवाय अमेरिका देखील मंदीच्या चक्रव्यूहात फसणार नाही. केंद्र सरकारची धोरणे विकासाला पूरक असतील, आणि रिझर्व्ह बँक देखील व्याजदरवाढीचे चक्र थांबवेल. पुढील चार वर्षात जीडीपीचा दर सध्याच्या म्हणजेच 4% च्या तुलनेत 8% होऊ शकतो. यातून बाजाराचा विचार केला तर कॉर्पोरेट कंपन्यांचा महसूल 20 ते 25% नी वाढण्याची शक्यता मॉर्गन स्टॅन्ले इंडियाचे इक्विटी स्टॅट्रेजिस्ट रिधम देसाई यांनी व्यक्त केली.  

...तर सेन्सेक्सची 52000 घसरगुंडी होईल

ज्याप्रकारे मॉर्गन स्टॅन्लेने सेन्सेक्सच्या वाढीचा अंदाज वर्तवला आहे तशाच प्रकारे बाजारात मोठी पडझड झाली तर सेन्सेक्स 52000 अंकांपर्यंत खाली येऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे. जर प्रमुख वस्तूंच्या किंमतीतीत दरवाढ, अमेरिका-युरोप मंदीच्या गर्तेत अडकला आणि रिझर्व्ह बँकेने रेपो दरवाढीचा सपाटा कायम ठेवला तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर होऊ शकतो. अशा बिकट परिस्थितीची शक्यता 20% असल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने म्हटले आहे.

निफ्टी 20500 अंकावर जाणार 

जागतिक पातळीवरील आणखी एका बड्या ब्रोकरेज कंपनीने भारतीय शेअर बाजाराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी डिसेंबर 2023 अखेर 20500 अंकांपर्यंत वाढेल, असा अंदाज गोल्डमन सॅक्स या कंपनीने व्यक्त केला आहे. निफ्टीच्या सध्याच्या पातळीत आणखी 10% वाढीची क्षमता आहे, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर मार्केटला प्राधान्य देत असून त्याचा फायदा मार्केटमधील तेजीला होईल.