अर्थव्यवस्थेतील रियल्टी, मेटल, ऑटो या क्षेत्रांची दमदार कामगिरी आणि परदेशी गुंतवणुकीचा जबरदस्त ओघ यामुळे शेअर मार्केटमध्ये तेजीचा बोलबाला आहे. आज बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने पहिल्यांदाच 63000 अंकांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 18700 अंकांवर गेला. या तेजीने गुंतवणूकदारांनी जोरदार कमाई केली. शेअर निर्देशांकांबरोबरच चलन बाजारात रुपयाने देखील डॉलरसमोर भक्कम कामगिरी केली. आज रुपया 33 पैशांनी मजबूत झाला आणि तो 81.39 वर स्थिरावला.
सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 26 शेअर तेजीसह बंद झाले. ज्यात महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, पॉवरग्रीड, भारतीएअरटेल, टाटा स्टील, टायटन, अॅक्सिस बँक, टीसीएस, इन्फोसिस हे शेअर तेजीसह बंद झाले. आयटीसी, एचसीएल टेक, एसबीआय, इंड्सइंड बँक या शेअरमध्ये घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 417 अंकानी वधारला आणि 63099 वर स्थिरावला. निफ्टी 140 अंकांच्या वाढीसह 18758 अंकांवर बंद झाला. आतापर्यंतचा हा सेन्सेक्स आणि निफ्टीचा सार्वकालीन उच्चांकी स्तर आहे.
आज मेटल उद्योगातील शेअरला प्रचंड मागणी दिसून आली. केईओसीएल, एनएमडीसी, हिंदुस्थान कॉपर, हिंदाल्को, नाल्को, सेल, जिंदाल स्टील हे शेअर तेजीसह बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर येस बँक, हुडको, भेल, बंधन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या शेअरमध्ये वाढ झाली. चालू वर्षात निफ्टीत 7.2% वाढ झाली आहे. बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. गुंतवणूकदार स्टॉक्स निवडीबाबत जागरुक असल्याने निवडक शेअरमध्ये तेजी दिसून येते, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, फेडरल रिझर्व्हचे प्रमुख लवकरच अहवाल सादर करतील. यात अमेरिकेतील महागाई आणि जागतिक पातळीवर मंदीचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे याचा परिणाम शेअर मार्केटवर काही प्रमाणात होऊ शकतो.
दुसऱ्या तिमाहीत विकास दर वाढीला ब्रेक (GDP Slows in Q2)
चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आर्थिक विकास दर 6.3% इतका राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वृद्धीचा वेग मंदावल्याचे दिसून आले. गेल्या आर्थिक वर्षात विकास दर 8.4% इतका होता. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने आज जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. या तिमाहीत खनिज उद्योगाचा वृद्धीदर उणे 2.8% नोंदवण्यात आला. कारखाना उत्पादना क्षेत्राचा विकास दर उणे 4.3% आणि कृषी क्षेत्राचा 4.6% दराने विकास झाला.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            