Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Costliest Dimond Ring: अंगठीवर जडले 50 हजारांहून अधिक हिरे! गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये झाली नोंद,जाणून घ्या किंमत…

50 thousand diamonds on the ring

Costliest Dimond Ring: मुंबईतील HK डिझाइन आणि हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही अंगठी तयार केली आहे. मार्च महिन्यात ही अंगठी बनवून तयार झाली आहे. सदर हिरेजडित अंगठीत एकूण 50,907 हिरे आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर या अंगठीबद्दल एक निवेदन जारी करण्यात आले आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

हौसेला मोल नाही असं उगाच म्हणत नाही. सोन्या-चांदीचे, हिरे मोत्यांचे शौकीन जगभरात तर आहेतच परंतु भारतात देखील त्यांची कमी नाही. जसे दागिन्यांचे ग्राहक हौशी असतात तसेच दागिने घडवणारे कारागीर देखील हौशी असतात असं म्हणायला काही हरकत नाही. मुंबईतील एका ज्वेलर्सने एक अशी अंगठी बनवली आहे, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली गेली आहे. आता तुम्ही म्हणाल असे काय आहे या अंगठीत? विश्वविक्रम आपल्या नावे करणाऱ्या या अंगठीत थोडेथोडके नाही तर तब्बल 50 हजारांपेक्षा अधिक हिरे जडले आहेत हे विशेष! इतके हिरे जडलेली ही जगातील एकमेव अंगठी आहे, त्यामुळेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद केली गेली आहे.

मुंबईतील ज्वेलर्सने केली कमाल!

मुंबईतील HK डिझाइन आणि हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही अंगठी तयार केली आहे. मार्च महिन्यात ही अंगठी बनवून तयार झाली आहे. सदर हिरेजडित अंगठीत एकूण 50,907 हिरे आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर या अंगठीबद्दल एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनानुसार,कंपनीचे  संस्थापक घनश्याम ढोलकिया यांनी सांगितले की, "गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेल्या मान्यतेबद्दल मी खूप आभारी आहे. हरी कृष्णा एक्सपोर्ट्स आणि एचके डिझाईन मधील आमच्या टीमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे हे फळ आहे."

अंगठीची किंमत किती?

  • या अंगठीचे वजन 460.55 ग्रॅम असून, त्यात वापरण्यात आलेल्या 50,907 हिऱ्यांचे वजन 130.19 ग्रॅम इतके आहे. या अंगठीसाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. 
  • बाजारभावानुसार या अंगठीची किंमत 6.43 कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • या अंगठीला एक स्पेशल नाव देखील देण्यात आलं आहे.'उत्तरिया रिंग' या नावाने ही अंगठी ओळखली जाणार आहे. 'उत्तरिया' या शब्दाचा अर्थ होतो निसर्गाशी एकरूप होणे. ही अंगठी फुलपाखराच्या रुपातली आहे.
  • ही अंगठी तयार करण्यासाठी डिझाइनर आणि कर्मचाऱ्यांना सुमारे नऊ महिने लागले अशी माहिती कंपनीने दिली आहे.
  • ही अंगठी 11 ते 14 मे या कालावधीत स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील जेमजेनेव्ह प्रदर्शनात तसेच 2 ते 5 जून दरम्यान जेसीके लास वेगास शोमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे.

हैदराबाद आणि मेरठचा मोडला विक्रम!

याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये, हैदराबाद येथील हॉलमार्क ज्वेलर्सने फुलांच्या आकाराच्या अंगठीत 7801 हिरे वापरून एक अंगठी बनवली होती. 2020 पर्यंत सर्वाधिक हिरे असलेल्या या अंगठीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश केला गेला होता. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील रेनानी ज्वेलर्सने एका घड्याळावर 17,524 हिरे जडवण्याचा विक्रम केला होता. आता मुंबईतल्या 'उत्तरिया' अंगठीने याआधीचे सगळे विक्रम मोडीत काढले असून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव दाखल केले आहे.