Reserve Bank of India: सध्या जमाना हा डिजिटल असल्यामुळे, देशात डिजिटल बॅंकिगदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी एटीएम (ATM) चा वापर कमी केला आहे. तरी ही सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे याच एटीएमसंबंधी सर्वाधिक म्हणजेच चार लाखापेक्षा अधिक तक्रारी ग्राहकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडे केल्या आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
तक्रारी कशा आल्या?
RBI ने एक 'बँकिंग लोकपाल'ची प्रणाली तयार केली आहे. जिथे बँकिंग किंवा बँकिंग सेक्टरशी संबंधित कोणत्याही प्रोडक्टशी निगडीत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करू शकतात. या प्रणालीमध्ये 1 एप्रिल ते 11 नोव्हेंबर 2021 या कालावधीत संपूर्ण देशातून एटीएम/डेबिट कार्डशी संबंधित सर्वाधिक तक्रारी बँक ग्राहकांकडून करण्यात आल्या आहेत.
9.39 टक्क्यांनी वाढ
आरबीआयने बुधवारी यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये सांगण्यात आले की, 2021-22 मध्ये, लोकपाल योजना किंवा केंद्रीय बँकेच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्षाकडे 4,18,184 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पाहता, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा आकडयात 9.39 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. यापैकी बँकिंग लोकपाल कार्यालयाने 3,04,496 तक्रारी सोडविल्या आहेत.
एटीएम व डेबिट कार्डच्या तक्रारी अधिक
आरबीआयच्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे एकूण तक्रारीपैकी सर्वाधिक तक्रारी म्हणजेच 14.65 टक्के एटीएम व डेबिट कार्डशी संबंधित आल्या होत्या. तर 13.64 टक्के तक्रारी या मोबाईल व इलेक्ट्रॉनिक बँकिंगशी संबंधित आल्या होत्या. या सर्व तक्रारींपैकी सुमारे 90 टक्के तक्रारी ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) पोर्टलसोबतच ई-मेल आणि सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टम (CPGRAMS) या डिजिटल माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. हा ग्राहकांचा एटीएम संबंधित तक्रार करण्याचा आकडा, खरचं आश्चर्यकारक आहे. कारण डिजिटलच्या युगात सध्या एटीएम कार्ड वापरण्याचे प्रमाण कमी आहे, तर मोबाईलव्दारे फोन पे, गुगल पे, पीटीएम यांसारख्या ऑनलाइन अँपच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरबीयआयकडे तक्रारीचा हा आकडा पाहून, आश्चर्य वाटणे साहजिकच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.