Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Moody’s On Aadhaar Card: "भारतातील दमट, उष्ण वातावरणात आधार कार्ड निरुपयोगी" मुडीजचा दावा भारताने फेटाळला

Moody’s On Aadhaar Card

Image Source : www.godigit.com/www.moodys.com

मूडीज या जागतिक दर्जाच्या रेटिंग संस्थेने भारताच्या आधार कार्ड प्रणालीवर ताशेरे ओढले आहेत. भारतातील उष्ण आणि दमट हवामानात आधार बायोमेट्रिक पद्धती निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मूडीजचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. अहवालातील माहितीला कोणताही आधार किंवा पुरावा नसल्याचे म्हटले आहे.

Moody’s On Aadhaar Card: मूडीज या जागतिक दर्जाच्या फायनान्शिअल रेटिंग कंपनीने भारताच्या आधार कार्ड प्रणालीवर ताशेरे ओढले आहेत. भारतातील उष्ण आणि दमट हवामानात आधार बायोमेट्रिक पद्धती निरूपयोगी आहे. त्यामुळे अनेकवेळा मजूर, कष्टकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. बायोमेट्रिकद्वारे ओळख पटवण्यात अडथळा आल्यामुळे अनेकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. तसेच आधार प्रणालीला डेटा चोरी आणि सुरक्षेचा धोका असल्याचेही मूडीजने अहवालात म्हटले आहे. 

जगातील सर्वात मोठा डिजिटल उपक्रम

दरम्यान, मूडीजने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. मुडीज रेटिंग कंपनीच्या इनव्हेस्टमेंट सर्व्हिसेस या विभागाने 23 सप्टेंबरला एक अहवाल प्रदर्शित केला. या अहवालाचे नाव "“Decentralized Finance and Digital Assets” असे होते. यामध्ये भारतातील आधार प्रणाली निरूपयोगी असल्याचे म्हटले आहे. आधार प्रणाली ही जगातील सर्वात मोठी डिजिटल आयडेंटिफिकेशन प्रणाली असल्याचं मान्य केलं. मात्र, त्याच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

बोटांच्या ठशाद्वारे ओळख पटवण्यात अडथळे 

आधार कार्डद्वारे कोट्यवधी भारतीयांना सेवा पुरवली जाते. बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि ओटीपीद्वारे नागरिकांची ओळख पटवली जाते. त्याद्वारे सरकारी सुविधांचा लाभ, नोंदणी, ओळख पुरावा यासह अनेक कामांसाठीचा प्रमुख पुरवा म्हणून आधार वापरले जाते. मात्र, आधार कार्डमधील बायोमेट्रिक तंत्रज्ञान उष्ण आणि दमट वातावरणात नीट काम करत नाही. मजूर, कामगार वर्गातील नागरिकांच्या बोटांच्या ठशाद्वारे ओळख पटवण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना सुविधा आणि लाभ नाकारण्यात येतात, असे अहवालात म्हटले आहे. 

"कमी उत्पन्न गटातील नागरिक आधारमुळे लाभापासून वंचित"

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजूरांना आधारप्रणालीद्वारे कामाचे पैसे दिले जातात. मात्र, अनेक मजूरांची आधार बायोमेट्रिकद्वारे ओळख पटवण्यात अडचणी येतात. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ घेता येत नाही, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मनरेगा कामगारांना डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

भारताने दावा फेटाळला 

मूडीजने अहवालात केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. कोणत्याही पुराव्या शिवाय जागतिक सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह प्रणालीवर मूडीने बिनबुडाचे आरोप केले. कोट्यवधी  नागरिकांचा आधार प्रणालीवर विश्वास आहे. 

मूडीजने अहवालात जे आरोप केले आहेत त्यासाठी आधी कोणताही अभ्यास किंवा संशोधन करण्यात आले नाही. बोटांच्या ठशांशिवाय डोळे आणि चेहऱ्याद्वारेही नागरिकांची ओळख पटवली जाते. अनेक सेवा या ओटीपीद्वारे ओळख पटवूनही देण्यात येतात. याकडे अहवालात दुर्लक्ष करण्यात आले आहे. आतापर्यंत आधारची माहिती लिक झाली नाही, असेही UIDAI ने प्रत्युत्तर देताना म्हटले आहे.