नोव्हेंबर 2016मध्ये देशाला नोटाबंदीचा (Demonetisation) सामना करावा लागला. अचानक नोटा बंद करण्यात आल्यानं सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. एटीएमबाहेर (Automated teller machine) लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या. त्यावेळी देशाला यूपीआयसारखा (Unified Payments Interface) डिजिटल पेमेंटचा एक उत्तम पर्याय मिळाला. भीम अॅपच्या (Bharat Interface for Money) रुपानं हा सोपा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. आज 8 वर्षांनंतर यूपीआयनं एटीएमलाच गिळंकृत केलंय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचे अहवालही हेच सांगत आहेत.
Table of contents [Show]
एसबीआयचा अहवाल
नोव्हेंबर 2016च्या नोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल पेमेंटला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) अहवालातही सविस्तर माहिती देण्यात आलीय. मागच्या 8 वर्षांत एटीएममध्ये जाणाऱ्यांची संख्या झपाट्यानं कमी झालीय. दुसरीकडे यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून झालेल्या व्यवहाराचा मात्र पूर आला, असं या अहवालात म्हटलंय. एसबीआयचं स्वत:चदेखील यूपीआय अॅप आहे.
Make seamless payments to Beneficiary VPA or UPI Number with the BHIM SBI Pay app.
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 17, 2023
Download on Apple App Store and Google Play Store. #SBI #BHIMSBIPay #AmritMahotsav #Payments pic.twitter.com/oeggufdUyM
एटीएमऐवजी यूपीआयला पसंती
एसबीआयनं हा एक आर्थिक संशोधन अहवाल मांडलाय. एसबीआय इकोरॅप (SBI Ecowrap) हा तो अहवाल असून याच्या ताज्या आवृत्तीत असं म्हटलंय, की एप्रिल 2016मध्ये एक भारतीय नागरिक वर्षातून सरासरी 16 वेळा एटीएमला भेट देत होता. एप्रिल 2023मध्ये हा आकडा फक्त 8 पट इतका राहिला आहे. यावरून देशात यूपीआयच्या माध्यमातून पेमेंटचं प्रमाण खूप वेगानं वाढलंय, हे लक्षात येतं. यासंबंधीचे आकडे पाहिल्यानंतरही ही बाब समोर येईल.
व्यवहारांचा महापूर
अहवालानुसार, 2016-17 ते 2022-23 या आर्थिक वर्षात यूपीआय व्यवहारांचा देशात पूरच आल्याचं म्हटलंय. त्यावेळी यूपीआयद्वारे व्यवहारांची संख्या फक्त 1.8 कोटी होती. ती आज 8,375 पर्यंत वाढलीय. आता देशातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 73 टक्के व्यवहार फक्त यूपीआयद्वारे केले जातात. एवढंच नाही तर यूपीआयच्या माध्यमातून फक्त 6,947 कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. आज त्याचा आकडा 139 लाख कोटी रुपयांच्याही पुढे गेलाय. यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये ही 2004 पट वाढ असल्याचं अहवालात म्हटलंय. यूपीआय व्यवहारात 1 रुपयाची वाढ झाली तर ती थेट डेबिट कार्ड पेमेंटवर पडते आणि त्यात 18 पैशांची घट होते, असंही एसबीआयच्या संशोधनात म्हटलं आहे.
इतर पर्यायांपेक्षा सुटसुटीत
पेमेंटच्या इतर कोणत्याही पर्यायापेक्षा किंवा आपण एटीएमचादेखील विचार केला तर त्या तुलनेत यूपीआय पेमेंट ही खूपच सुटसुटीत प्रक्रिया आहे. एटीएमसाठी आपल्याकडे डेबिट कार्ड असणं गरजेचं असतं. शिवाय एटीएमला जाण्यासाठी वेगळा वेळ खर्च करावा लागतो. ही मोठी गैरसोय असते. यूपीआयद्वारे मात्र एका क्षणात पैसे ट्रान्सफर होत असतात. नेटवर्क नसेल किंवा इंटरनेट नसेल तरी पेमेंटमध्ये फारशा अडचणी नसतात. यूपीआय लाइट हा ऑप्शनदेखील सरकारनं उपलब्ध करून दिलाय. एका वेळी जास्तीत जास्त 200 रुपयांचे व्यवहार होऊ शकतात. हा पर्याय फारसा वापरात नाही, मात्र त्यामुळे गैरसोय दूर होण्यास मदत होते. यात कोणतं कार्ड बाळगण्याची आवश्यकता नाही, कुठे जाण्याची गरज नाही. त्यामुळे याला अधिकाधिक लोक पसंत करत असल्याचं दिसतंय.