मराठीमध्ये एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे 'घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून' या म्हणी मागे अनेक अर्थ आहेत. घर आणि लग्न ही दोन्ही कार्ये करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातील लग्नाविषयी बोलायचे झाल्यास लग्न हा प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय सोहळा असतो. त्यामुळे तो धुमधडाक्यात करण्यासाठी भरपूर खर्च करण्याची तयारी असते. मात्र, काहीवेळा लग्नासाठी पैसा उभा करण्यात अनेक अडचणी येतात. अशा प्रसंगात भविष्य निर्वाह निधी खाते धारकांना (EPF) लग्नासाठी पीएफ खात्यामधून पैसे काढता येतात. यासाठी काय नियम अटी आहेत हे आपण जाणून घेऊयात.
भविष्य निर्वाह निधीच्या खातेधारकांनी जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतरची तरतूद आहे. परंतु, जर तुम्हाला लग्न कार्यासारख्या विशिष्ट कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढायची गरज असेल तर तुम्हाला ती काढता येते. मात्र, त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.
नोकरीची सात वर्षे पूर्ण
तुम्ही EPFO चे खातेधारक आहात आणि लग्न कार्यासाठी खात्यामधून रक्कम काढायची असेल तर तुमच्या नोकरीची 7 पूर्ण झालेली असावीत. अत्यंत तातडीचे इतर कोणते कारण असेल तर 5 वर्षानंतर तुम्हाला रक्कम काढता येते. मात्र लग्नासाठी रक्कम काढायची असेल तर EPFO च्या नियमांनुसार खातेधारकास स्वत:च्या लग्नासाठी किंवा बहीण, भाऊ, मुलगा अथवा मुलीच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.
50% रक्कम काढता येणार
ईपीएफओ खात्यातून लग्नासाठी पैसे काढण्यासाठी आणखी एक अट आहे, ती म्हणजे खातेधारकास 50% पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. या शिवाय लग्न आणि शिक्षणासाठी पीएफ खात्यातून यापूर्वी 3 पेक्षा जास्त वेळा पैसे काढलेले नसावेत. तरच तुम्हाला लग्नासाठी पैसे काढता येणार आहेत. लग्नासाठी अर्ज करत असताना लग्न पत्रिका, जन्म दाखला यासारखी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.