एखादी दुर्देवी घटना घडली तर आपल्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी विमा पॉलिसी असावी, हा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. त्याबरोबरच विमा पॉलिसीचा लाभ आपल्यालाही आयुष्यभर मिळत राहावा, असे अनेकांना वाटत असते. अशा स्थितीत मनी बॅक पॉलिसी हा एक चांगला पर्याय राहू शकतो.
मनी बॅक प्लॅन (Money Back Plan) ही पारंपरिक जीवन विमा योजना आहे. विम्याचे सुरक्षाकवच आणि विशिष्ट टप्प्यांवर आर्थिक परतावा असा दुहेरी लाभ यामुळे मिळतो. पॉलिसीमध्ये मिळालेली रक्कम आपण गरजेनुसार खर्च केल्यास किंवा ती इतर कोणत्याही गुंतवणुकीच्या साधनात गुंतवली तर कमाईची संधी पुढे वाढते. या योजनेतंर्गत कंपनी 15, 20 आणि 25 किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत विमाधारकाला 3 वर्षे, 4 वर्षे आणि 5 वर्षाच्या अंतराने एकूण विमा कवचाच्या काही टक्के रक्कम विमा कंपनीकडून दिली जाते.
याबाबत एक उदाहरण पाहुया. रमेशने मनी बॅक योजनेत 10 लाख विमा कवच असलेली योजना घेतली आहे. या योजनेचा कालावधी 20 वर्षाचा आहे. मनी बॅक प्लॅन असल्याने रमेशला 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विमा कवचाचे पैसे मिळतील. पण त्याचबरोबर प्रत्येक 5 वर्षानंतर विमा कवचाच्या 10 टक्के रक्कम मनी बॅक म्हणून मिळेल.
काही जीवन विमा कंपन्या या पॉलिसी मॅच्युअर होण्यापूर्वी शेवटच्या 4 वर्षात मनी बॅकचा लाभ प्रदान करतात. अशा वेळी मिळणारी रक्कम अधिक राहू शकते. उदाहरणार्थ 20 वर्षाच्या मनी बॅक योजनेत विमाकवच 20 लाखांचा असेल तर 16, 17, 18, 19 व्या वर्षी विमाधारकाला प्रत्येकी 3 लाख रुपये म्हणजेच एकूण 12 लाख रुपये मिळतील आणि 20 व्या वर्षी एकूण कवचाची उर्वरित रक्कम 8 लाख रुपये आणि बोनस मिळेल.
मनी बॅक योजनेत अतिरिक्त हप्ता देऊन पॉलिसीधारकाला क्रिटिकल इलनेस रायडर मिळू शकतो. यामुळे विमाधारकास अत्यंत गंभीर स्थितीत असल्यास आरेाग्य सुविधा मिळतात. याशिवाय अॅक्सिडेंटल बेनिफिट रायडरतंर्गत कोणत्याही दुर्घटनेत विमाधारकाचे निधन होणे किंवा स्थायी स्वरुपात दिव्यांग झाल्यास अतिरिक्त लाभ प्रदान केले जातात. अपंगत्व आल्यामुळे हप्ता भरला नाही तरीही विमा कवच कायम ठेवण्यात येतो.
भारतीय टपाल खात्या (Indian Post Office)मध्ये ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Gram Sumangal Rural Postal Life Insurance Scheme) ही एक उत्तम मनीबॅक पॉलिसी आहे. यातील 15 वर्षांच्या पॉलिसी अंतर्गत, विमा रकमेच्या 20-20 टक्के रक्कम 6, 9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतात. उर्वरित 40 टक्के रक्कम बोनससह मॅच्युरिटीनंतर उपलब्ध होते. त्याचप्रमाणे, 20 वर्षांच्या पॉलिसी अंतर्गत, 20-20 टक्के रक्कम आठ, 12 आणि 16 वर्षांच्या कालावधीत पैसे परत म्हणून मिळेल. उर्वरित 40 टक्के रक्कम मुदतपूर्तीवर बोनससह दिली जाते.
मनी बॅक पॉलिसीवर कंपनी कोणत्याही प्रकारची कर्जाची सुविधा देत नाही.