तब्बल चार वर्षानंतर म्हाडाकडून मुंबईत घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मुंबईतील घरांची लॉटरी रखडली होती. अखेर म्हाडाकडून आज 22 मे 2023 रोजी मुंबईतील 4083 घरांच्या लॉटरी जाहीर झाली. मात्र चार वर्षांनंतर जाहीर होणाऱ्या या सोडतीत घरांच्या किंमती पाहून इच्छुकांचे डोळे पांढरे होण्याची शक्यता आहे. या सोडतीत घराची कमीत कमी किंमत 30 लाख 44 हजार रुपये असून सर्वात महागडे घर 7 कोटी 57 लाख रुपयांना विकले जाणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून म्हाडाच्या मुंबईतील सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर गेल्या आठवड्यात म्हाडाकडून मुंबईतील घरांच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली. आज दुपारी 3 वाजता अर्ज भरण्याची प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. मात्र यंदाच्या लॉटरीसाठी मुंबईतील घरांच्या किंमतीत वाढ झाल्याचे बोलले जाते.
लॉटरीसाठी म्हाडाने घराची किंमत सर्वात कमी 30 लाख 44 हजार रुपये इतकी ठेवली आहे. याशिवाय म्हाडाने यंदा लक्झुरी फ्लॅट्स देखील लॉटरीमध्ये उपलब्ध केले आहेत. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. परवडणाऱ्या घरांपासून लक्झरी अलिशान फ्लॅट्ससाठी ग्राहकांना लॉटरीमध्ये अर्ज सादर करावे लागणार आहेत.
म्हाडाच्या लॉटरीनुसार गोरेगाव पहाडी येथील प्रोजेक्टमधल्या एका फ्लॅटची किंमत 30 लाख 44 हजार इतकी आहे. त्याशिवाय जुहूमधील फ्लॅट्सची किंमत 4 कोटी 83 लाख रुपये इतकी आहे. या लॉटरीमध्ये ताडदेवमध्ये सर्वात महागडी प्रॉपर्टी म्हाडाकडून विक्री केली जाणार आहे. ताडदेवमध्ये 1500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅट्ससाठी 7 कोटी 57 लाख रुपये इतकी विक्रमी किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करुन देणाऱ्या म्हाडाचा इतक्या महागड्या फ्लॅटने कितपत उद्देश साध्य होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबईतील गोरगाव पहाडी या ठिकाणी सर्वाधिक घरे
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे पहाडी या ठिकाणी म्हाडाने यंदाच्या लॉटरीसाठी सर्वाधिक घरे उपलब्ध केली आहेत. यात अत्यल्प, अल्प गटासाठी घरे आहेत. पहाडी गोरेगाव येथे एकूण 2670 घरे लॉटरीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. या घरांची किंमत 30 लाख 44 हजारांपासून 45 लाख 86 हजार इतकी आहे.
उपनगरात म्हाडाची कोटींची उड्डाणे
- पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये म्हाडाने घरे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत.
- महावीर नगरमधील फ्लॅटची किंमत 1 कोटी 18 लाख 14 हजार इतकी आहे.
- जुहूमधील काही सदनिकांसाठी म्हाडाने 2 कोटी 71 लाखांपर्यंत किंमत निश्चित केली आहे.
- अंधेरी पश्चिम येथील जेव्हीपीडी स्कीम येथे फ्लॅटची किंमत 3 कोटी 78 लाख ते 4 कोटी 84 लाख इतकी आहे.
- दादर येथील फ्लॅट्ससाठी म्हाडाने 1 कोटी 65 लाख रुपये ते 2 कोटी 32 लाख रुपये इतकी किंमत ठेवली आहे.
- पवईतील फ्लॅटसाठी 1 कोटी 3 लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
- लॉटरीमधील सर्वात महागडी प्रॉपर्टी दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरात आहेत.
- ताडदेवमधील फ्लॅट्सची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाख 94 हजार इतकी आहे.