भारतामध्ये मागील वर्षात आलिशान गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सेगमेंटमधील गाड्यांची विक्री वाढल्याने आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्यांनी नवनवीन मॉडेल बाजारात आणण्यावर भर दिला आहे. मर्सिडीज बेंझ कंपनी चालू वर्षामध्ये भारतीय बाजारात १० नवी मॉडेल्स आणणार आहे. ही सर्व मॉडेल टॉप एंड कॅटेगरीतील असल्याने त्यांची किंमतही जास्त असण्याची शक्यता आहे.
चालू वर्षामध्ये मर्जिडीजच्या गाड्यांचे ग्राहक वाढवण्यासाठी कंपनीने योजना आखली असून त्यानुसार नवीन दहा मॉडेल्स बाजारात आणण्यात येतील, असे कंपनीचे भारतातील प्रमुख संतोष अय्यर यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षात मर्सिडीज कंपनीच्या टॉप मॉडेल्सची विक्री वाढली आहे. Maybach, AMG, S-Class आणि EQS या गाड्यांची विक्री 2022 वर्षात 69 टक्के वाढल्याचे अय्यर यांनी सांगितले.
www.gaadiwaadi.com
कोरोनाच्या आधीच्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये टॉप एंड श्रेणीत मर्सिडीज गाड्यांच्या विक्रीचा वाटा 12 टक्के होता. त्यामध्ये वाढ होऊन 2022 मध्ये 22 टक्के झाला आहे. मर्सिडीज गाडी विकत घेणाऱ्या ग्राहकाचे सरासरी वयही आता खाली आले आहे. एस क्लास श्रेणीतील कार घेण्याऱ्या ग्राहकाचे वय आता 38 पर्यंत खाली आले असून सी क्लास श्रेणीतील ग्राहकाचे वय 35 झाल्याचे अय्यर यांनी सांगितले. कमी वयात आलिशान गाडी घेणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढत असल्याचे या आकडेवारीवरून दिसते.
2 जानेवारीला कंपनीने पुण्यातील चाकण येथील प्रकल्पातून दीड लाख कार निर्मितीचा टप्पा गाठला. कंपनीने मागील वर्षात आधीचे रेकॉर्ड मोडत सर्वात जास्त गाड्यांची निर्मिती केली. 2023वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने Mercedes-AMG E 53 4MATIC+ Cabriolet या गाड्या लाँच करून केली. न्यू जनरेशन GLC गाडी या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येणार आहे. या आलिशान गाडीची किंमत १ कोटीपेक्षा जास्त आहे.