Whatsapp Fraud : ऑनलाईन पद्धतीने घोटाळे किंवा आर्थिक फसवणूक करण्याच्या नवीन पद्धती सायबर चोर शोधून काढताना दिसत आहेत. अलीकडेच समोर आलेल्या एका नवीन प्रकरणात तर ती व्यक्ती नोकरी करत असलेल्या कंपनीच्या सीईओ कडूनच त्याला एसएमएस आल्याचं भासवण्यात आलं. नशीबाने ही व्यक्ती सतर्क असल्यामुळे फसवणूक टळली. पण, हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी ट्विटरवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आणि त्यातून चोरांची नवीन पद्धतही जगासमोर आली आहे.
हा प्रकार घडला आहे मीशू या ऑनलाईन शॉपिंग साईटमध्ये काम करणारे कर्मचारी शिखर सक्सेना यांच्याबरोबर. त्यांचे सीईओ विदित आत्रे यांच्या नावाने त्यांना आलेला मेसेज त्यांनी ट्विट केल्यावर काहींनी त्यांनाही असाच अनुभव आल्याची प्रतिक्रिया दिली आहे!
नेमकं काय घडलं बघूया,
काय होता मॅसेज
घोटाळेबाजाने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म मीशूचा कर्मचारी शिखर सक्सेना याला मीशूचे संस्थापक आणि सीईओ विदित आत्रे असल्याचे भासवून एक मॅसेज पाठविला. त्यानंतर घोटाळेबाज व्यक्तीने सक्सेनाला एका क्लायंटसाठी पेटीएमवर खरेदी करण्यास सांगितले. महत्वाचे म्हणजे पैश्यांची परतफेड करण्याचे आश्वासनही दिले. "हॅलो शिखर, तु आहेस का?, मी सध्या एका क्लायंटसोबत कॉन्फरन्स कॉलवर आहे आणि मला या क्लायंटला काही भेटवस्तू द्यायच्या आहेत. तुम्ही ही खरेदी पेटीएम वरून करू शकता का, याची खात्री कराल का? मी तुम्हाला परतफेड करीन". असा मॅसेज कर्मचारी शिखरला आला होता.
ट्विटरवर शेअर केली पोस्ट
मात्र कर्मचारी शिखर सक्सेना हा सावध असल्यामुळे तो या फसवणूकीचा बळी पडला नाही. त्यानंतर अश्या घोटाळ्यांपासुन इतरांना सावध करण्यासाठी एक्सचेंजचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला. तसेच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट शेअर करताना शिखरने लिहिले की, "स्टार्टअप जगतातील नवीनतम घोटाळा - सीईओकडून संदेश". मीशूचे कर्मचारी शिखर सक्सेना यांनी पोस्ट टाकल्यानंतर लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या.
विविध मार्गांनी होतो लुटण्याचा प्रयत्न
या आधुनिक काळात जवळजवळ सर्वच नागरिक ऑनलाईन प्रणाली वापरुन पैश्यांचे व्यवहार करतात. याचाच फायदा घोटाळबाज घेत आहेत. अनेकदा एखादी स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करुन, किंवा कुणाला बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवुन, वेगवेगळ्या कारणांनी बँकेचे डिटेल्स घेऊन घोटाळेबाज लुटण्याचा प्रयत्न करतात.